पान:इहवादी शासन.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १३३
 

विश्वविजयाची आकांक्षा होती व त्यांनी तें स्वप्न प्रत्यक्षांत आणलें होतें हें आज इतिहाससिद्ध सत्य आहे आणि ते तसे कट्टे प्रवृत्तिवादी अभ्युदयाकांक्षी असल्यामुळेच त्यांनी आपलें जीवनाचें तत्त्वज्ञानहि इहवादाच्या पायावरच उभारलें होतें हेंहि तितक्याच निश्चयाने इतिहास सांगत आहे.
 त्या प्राचीन पंडितांनी धर्माच्या ज्या व्याख्या केल्या आहेत त्यांवरूनच हा विचार स्पष्ट होतो. लोकांच्या प्रभवासाठी (उत्कर्षासाठी) धर्मनियम केलेले असतात, म्हणून प्रभवसंयुक्त म्हणून जें जें कांही असेल तो धर्म होय. धर्म हा लोकयात्रेसाठीच सांगितलेला असतो. अभ्युदय व निःश्रेयस यांची प्राप्ति ज्या योगें होईल त्यालाच धर्म म्हणतात. समाजाचें धारण त्याच्या आधारें होतें म्हणून त्याला धर्म म्हणतात. ज्या धर्माने अनेकांचा घात होतो तो धर्म नसून कुमार्ग होय. म्हणून समाजहिताशीं अविरोधी अशी जी कृति तीच धर्म होऊं शकते. धर्माची उपासना का करावी हें सांगतांना, त्यापासून अर्थ- काम प्राप्त होतात म्हणून त्याचें सेवन करावें असें वेदव्यास म्हणतात. या व्याख्या पाहिल्या म्हणजे त्या रचणाऱ्या पंडितांच्या मनाचा सगळा रोख ऐहिक उत्कर्षाकडे होता, समृद्धीकडे, वैभवाकडे होता याविषयी शंका राहत नाही.

महाभारतांतील विवेचन

 महाभारतांत धर्म, अर्थ व काम यांच्या महत्त्वाविषयी युधिष्ठिर, विदुर, अर्जुन, भीम यांच्यामध्ये झालेल्या वादविवादाचा वृतान्त दिलेला आहे. त्यावरून अर्जुन व भीम हे कडवे इहवादी होते, असें दिसून येतें. विदुराच्या मतें धर्म हा सर्वश्रेष्ठ असून अर्थ व काम गौण होत. त्यावर आक्षेप घेऊन अर्जुन म्हणाला, "ही कर्मभूमि आहे. येथे प्रपंचाचा उद्योग हा सर्वांत महत्त्वाचा होय. तेव्हा कृषि, गोरक्ष्य, वाणिज्य व विविध कला या समृद्धि साधनांचेंच येथे जास्त महत्त्व मानले पाहिजे. कारण त्यां पासून अर्थप्राप्ति होते आणि अर्थावांचून धर्मसाधना अशक्य आहे. अर्जुनाला महाभारतांत अर्थविशारद म्हटलें आहे. त्याने आपला पक्ष मांडतांना निक्षून सांगितलें आहे की, "इंद्रियनिग्रही वैराग्यशील पुरुष, भगवीं वस्त्रे नेसून राहणारे विद्यासंपन्न पुरुष, हेहि अर्थप्राप्तीची इच्छा धरतात, आस्तिकांना धन हवें असतें, नास्तिकांना हवें असतें. फक्त अज्ञ व मूढ लोकांनाच अर्थाचें श्रेष्ठत्व आकळत नाही."
 भीमाचें मत याहिपेक्षा लक्षणीय आहे. तो म्हणतो, "धर्म, अर्थ व काम यांत काम हाच श्रेष्ठ होय. ज्याला कसलीहि कामना नाही, इच्छा नाही तो मनुष्य अर्थाची उपासना करणार नाही. एवढेच नव्हे तर धर्माचीहि करणार नाही. कशाची तरी कामना असते म्हणूनच ऋषि तप आचरतात, उपासना करतात व देह झिजवतात. कांही आकांक्षा असते, काम असतो म्हणूनच पंडित वेदांचा अभ्यास करतात. व्यापारी, शेतकरी, गोप, कलाकार हे सर्व कामप्रेरित होतात म्हणूनच