पान:इहवादी शासन.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२ । इहवादी शासन
 

 शब्दप्रामाण्याचें तत्त्व हेंच खरें इहवादाला घातक असें तत्त्व होय. कुराण व बायबल या ग्रंथांच्याविषयीचें अंधप्रामाण्य त्या त्या समाजांच्या अपकर्षास कसें कारण झालें होतें, हें मागील प्रकरणांत अनेक ठिकाणीं दाखवून दिलेलें आहे. उत्तरकाळांत हेंच शब्दप्रामाण्य भारतांतहि रूढ झाल्यामुळे हिंदु धर्माचीहि अपरिमित हानि झालेली आहे. पण प्राचीन काळीं असें प्रामाण्य नव्हतें.

अंधप्रामाण्याला विरोध

 वेद हे हिंदु धर्माचे पूज्य ग्रंथ होत याविषयी वाद नाही. पण मीमांसा- पंथाने जें सर्वंकष प्रामाण्य वेदांच्या ठायीं मानलें तें प्राचीनांना मुळीच मान्य नव्हतें. "वेदवाक्य प्रमाण मानून त्याखेरीज दुसरें कांही नाही असें म्हणणारे लोक मूढ होत", "हे अर्जुना, वेद हे केवळ त्रैगुण्याच्या गोष्टींनी भरलेले आहेत, तूं त्रिगुणातीत हो" हीं गीता-वचनें सर्वश्रुतच आहेत. "वेदांवरून धर्माचें संपूर्ण व निर्दोष ज्ञान होऊं शकत नाही, कारण वेदांत सांगितलेल्या गोष्टी, ते वेद ज्या युगांत झाले असतील त्याच्या नंतरच्या युगांत निरुपयोगी ठरतात" असें महाभारतकारांनी म्हटलें आहे (शांति, २६०- ७). स्मृति जशा भिन्न भिन्न काळी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे वेदांतील सूक्तेंहि भिन्न भिन्न काळी रचलेलीं आहेत, यावरून तीं मानवकृतच आहेत, आणि म्हणूनच वेदांचें अपौरुषेयत्व व प्रामाण्य फोल ठरतें, हें तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांनी 'धर्मस्वरूप-निर्णय' या आपल्या ग्रंथांत दाखवून दिलें आहे. त्या काळीं पाणिनी, पतंजली, सांख्यसूत्रकार, तत्त्वचिंतामणीकार यांसारखे थोर पंडित वेदांचें सर्वंकष अंधप्रामाण्य मुळीच मानीत नव्हतें हेंहि कोकजेशास्त्री यांनी 'वेदप्रामाण्य- विचार' या प्रकरणांत स्पष्ट केलें आहे. (धर्मस्वरूप निर्णय, पृष्ठे ४८-५०).
 उपनिषत्कर्ते ऋषि व भिन्न दर्शनांचे द्रष्टे मुनि यांचीहि वेदांविषयी हीच वृत्ति होती, हें आज उपलब्ध झालेल्या इतिहासावरून निश्चित दिसतें. तेव्हा भारताच्या प्राचीन वैभवाच्या काळी येथले शास्त्रवेत्ते, तत्त्ववेत्ते, धर्माचार्य व इतर थोर पंडित हे शब्दप्रामाण्याच्या विकृतीपासून मुक्त होते असें ज्या अर्थी निश्चित म्हणतां येतें, त्या अर्थी त्या काळचें वातावरण बरेंचसें इहवादी होतें याविषयी दुमत होईलसें वाटत नाही.
 धर्माची परिवर्तनीयता, बुद्धीचें, विवेकाचें प्रामाण्य, शब्दप्रामाण्याचा त्याग हीं इहवादाचीं लक्षणें आहेतच; पण सर्वांत महत्त्वाचें लक्षण म्हणजे प्रवृत्तिपरता हे होय. ऐहिक जीवनांतील उत्कर्ष, समृद्धि, वैभव यांची इहवादाला दुर्दम्य आकांक्षा असते. उद्योग, व्यापार, कृषि, राज्य, साम्राज्य, विश्वविजय यांविषयीची जबरदस्त ईर्षा, स्पृहा हा इहवादाचा आत्मा होय. हा ऐहिक उत्कर्ष साधावयाचा असतो म्हणूनच कुठल्या तरी जुनाट पोथींतल्या ताडपत्रावरच्या अक्षरांची जखडबंदी पराक्रमी पुरुष मानावयाला तयार नसतो. प्राचीन भारतांतले पुरुष असे पराक्रमी होते. त्यांना