पान:इहवादी शासन.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १३१
 



परिस्थित्यनुरूप बदल

 भारताचा इसवीसनाच्या नवव्या-दहाव्या शतकापर्यंतचा इतिहास पाहतां एक गोष्ट स्पष्ट दिसते की, त्या काळांत अखंडपणें नवे नवे धर्मशास्त्र रचलें जात होतें. निरनिराळ्या स्मृति या धर्मशास्त्र सांगण्यासाठीच रचल्या गेल्या. पूर्वी धर्म हा शब्द कायदा, दंडविधान या अर्थी वापरला जात असे हें ध्यानांत घेतां देश काल परिस्थिति पाहूनच त्या वेळीं कायदे केले जात असत हें उघड आहे; आणि केवळ श्रुतिवचना- वरून शब्दप्रामाण्य मानून कायदा न करतां परिस्थिति पाहून दंडशास्त्राची रचना करणें, हें तर इहवादाचें प्रधान तत्त्व आहे. कृत, त्रेता, द्वापर व कलि या प्रत्येक युगांत धर्म निराळा असतो, एके काळी जो धर्म असतो तो अन्य काळीं अधर्म ठरूं शकेल, हीं वचनें प्रसिद्ध आहेत. (महा. शां. ३६. ११) मनु, बौधायन, अत्रि यांसारख्या स्मृतिग्रंथांत जागजागीं देशकालाचें महत्त्व सांगितलेले आढळते. पूर्वीच्या स्मृतिकारांचें अमकें मत मला मान्य नाही, आता काळ पालटला आहे, तेव्हा तें त्याज्य मानले पाहिजे, असेंहि अनेक स्मृतिकारांनी निर्भयपणें म्हटलेले आहे. तेव्हा धर्म हा परिवर्तनीय आहे व नवें धर्मशास्त्र रचतांना, देश-काल-परिस्थिति पाहून तें रचलें पाहिजे, हा सिद्धान्त भारतांत प्राचीन काळीं धर्मशास्त्रज्ञांना मान्य होता यांत शंका नाही.
 देश-काल पाहून नवे धर्मसिद्धान्त सांगावयाचे हें तत्त्व मान्य करतांच धर्मनिर्णय हे बुद्धीने करावयाचे असतात, त्यासाठी जुन्या धर्मग्रंथांतील वचनांवर अवलंबून राहणें युक्त नाही, धर्मशास्त्रांत मनुष्यबुद्धीला अवसर असला पाहिजे, हें दुसरें तत्त्व मान्य करण्यावांचून गत्यंतरच नसतें. प्राचीन पंडितांनीं तें भारतांत मान्य केलें होतें, हें आज सर्वमान्य झालेलें आहे. धर्मशुद्धि करणाऱ्यांनी, प्रत्यक्ष अनुमान व विविध शास्त्र यांचा आश्रय करावा असें मनूने स्पष्ट म्हटलें आहे (मनु. १२. १०५). महाभारतांत जागोजागी धर्मनिर्णय करतांना बुद्धीचा अवलंब करावा, तर्काचा आश्रय करावा, केवळ शास्त्रावरून निर्णय केला तर धर्महानि होईल, असें आवर्जून सांगितलेले आहे. प्रत्यक्ष या शब्दांत भोवतालची परिस्थिति व पूर्वेतिहास यांचा समावेश होतो.
 प्राचीन धर्मचिकित्सक आपले मत प्राचीन इतिहासाच्या आधारे मांडत असत, असें ठायीं ठायीं दिसून येतें. राम, इंद्र, भीष्म, अर्जुन, भीम यांच्या तोंडी श्रूयते, श्रूयते हा शब्द वारंवार येतो. त्यांत इतिहासाचा आधारच अभिप्रेत आहे, हे उघड आहे. चाणक्याने तर धर्मग्रंथ, व्यवहार (कायदा), चरित (इतिहास) व राज्यशासन हे धर्माचे चार आधार आहेत, असें सांगून यांत विरोध आल्यास 'पश्चिमः पूर्वबाधकः' असें उत्तरोत्तरप्रामाण्य मानावें असा निर्णय दिला आहे. राज्यशासनाचां निर्णय धर्मग्रंथापेक्षाहि जास्त प्रमाण, असें म्हणणारा चाणक्य किती बुद्धिप्रामाण्यवादी असला पाहिजे हें सहज ध्यानांत येईल. शासनावर धार्मिक ग्रंथांचें, त्यांतील अंधसिद्धान्ताचें मुळीच वर्चस्व असतां कामा नये, हा त्याचा अभिप्राय येथे स्पष्ट दिसतो. इहवाद याहून निराळा काय असतो ?