पान:इहवादी शासन.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १२९
 

गूढ, असें एक तत्त्वज्ञान मार्क्सने सांगितलें आणि त्याचे अनुयायी पोपसारखेच, धर्माचार्यासारखेच, बुद्धिवादाचे, स्वतंत्र प्रज्ञेचे, व्यक्तिवादाचे हाडवैरी बनले. साधारण याच काळांत हेगेलच्या तत्त्वज्ञानाची अशीच दुष्परिणति जर्मनींत हिटलरने केली. हेगेलने शासनाची एक आध्यात्मिक उपपत्ति बसविली होती. तीअन्वये शासन ही अमूर्त परब्रह्मासारखीच एक वस्तु आहे आणि वंशपरंपरेने आलेला राजा हा तिचेंच मूर्त रूप आहे. या तत्त्वज्ञानान्वये व्यक्तीसाठी शासन नसून शासनासाठी व्यक्ति आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, जनतेचें शासनावरील नियंत्रण, शासन पदच्युत करण्याचा व्यक्तीचा अधिकार हें सर्व संपुष्टात येतें.
 हिटलरने जर्मनीत हेंच केलें. जर्मन लोक, भौतिकशास्त्रे, स्वतंत्र प्रज्ञा, संघटना विद्या यांसाठी जितके प्रसिद्ध आहेत तितकेच अविवेक, अंधनिष्ठा, त्यांनी येणारा पिसाटपणा यांसाठीहि प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच फ्रान्सप्रमाणेच जर्मन लोक लोकशाही यशस्वी करण्यास कधीहि समर्थ झाले नाहीत. केप्लर, लूथर, लिबनिटस्, मॅक्स प्लॅक आइनस्टाईन, हर्षल, हर्टस, बिस्मार्क असे थोर पुरुष ज्या जनतेने निर्माण केले तीच जनता, तेच लोक विसाव्या शतकांत हिटलरच्या कमालीच्या अर्थशून्य, विवेकहीन, शास्त्रहीन, अंध व अत्याचारी तत्त्वज्ञानाच्या आहारीं जाऊं शकतात याचा अर्थ फार वाईट आहे. अत्यंत श्रेष्ठ कर्तृत्व व प्रज्ञा अंगी असलेला एक मोठा समाज मधून मधून आंधळ्या दुराग्रहाने पछाडला जातो व मानवसमाज त्याच्या प्रचंड कर्तृत्वाला दीर्घकाळपर्यंत मुकतो हा त्याचा अर्थ आहे. अंध धर्मसत्ता किंवा तत्सम दुसरी सत्ता यांमुळे यापेक्षा जास्त हानि ती काय व्हावयाची ?
 लोकसत्ता हा एक प्रजागर आहे, अखंड सावधता, असें म्हणतात. वरील इतिहासावरून इहवादाविषयीहि तेंच म्हणावें लागेल.

 इ. शा. ९