पान:इहवादी शासन.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८ । इहवादी शासन
 

देण्यापूर्वी थोडा वेळ प्रार्थना करीत असे. प्रा. व्हाईट हेड म्हणतो, "या विश्वाला धर्मामुळेच अर्थ प्राप्त होतो. मानवाचें अंतिम प्राप्तव्य त्यामुळेच समजते. मात्र तें अंतिम सत्य बुद्धीच्या पलीकडे आहे." (सायन्स अँड मॉडर्न वर्ल्ड, पृष्ठ २३८) ऑलिव्हर लॉज, आइन्स्टाईन या थोर शास्त्रज्ञांनी परमेश्वर मानण्यावांचून जगाचें गूढ उकलणार नाही, असाच निर्वाळा दिला आहे.
 या विश्वाला रचना आहे, त्यांत सुसंगति आहे, त्यांत व्यवस्था आहे, असें तत्त्ववेत्ते म्हणतात आणि भौतिक शास्त्राच्या प्रत्येक नव्या शोधांमुळे हेंच सिद्ध होत आहे. तेव्हा आज परमेश्वराचें अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धर्माचार्यहि भौतिक- शास्त्रांचीं प्रमाणें आग्रहाने पुढे मांडतांना दिसतात आणि एकदा परमेश्वराचें अस्तित्व शास्त्रीय प्रमाणांवर अवलंबून ठेवल्यानंतर तत्त्वज्ञान, नीति व सदाचार यांचे निकषह विज्ञानानेच निश्चित करणें युक्त होय हें कांही सांगावयास पाहिजे असें नाही. इहवादाची यापलीकडे कसलीच मागणी नाही. त्याचा धर्माशीं, परमेश्वराशीं, भक्ति, प्रार्थना, नीति यांच्याशी कधीहि विरोध नव्हता व नाही. देकार्त, न्यूटन, व्हॉल्टेअर सर्व धर्मनिष्ठ होते. परमेश्वरावर त्यांची अंध श्रद्धा होती. ऐहिक जगांतील सत्यासत्य निसर्गविषयक ज्ञान, राजनीति, आचार-विचार, नीति- अनीति, सामाजिक रचनेची तत्त्वें, ही धर्मपीठाच्या अंध, दुराग्रही मतावर अवलंबून ठेवू नयेत एवढाच इहवादाचा प्रारंभापासून आग्रह होता व अजूनहि आहे.

धर्मसत्तेची पकड

 पश्चिम युरोपांतील इहवादाचें विवेचन येथवर केलें. त्याआधी सोव्हिएट रशिया व मुस्लिम देश यांतील इहवादाच्या प्रगति- परागतीचा इतिहास आपण पाहिला. त्यावरून मानवी मनावरची धर्मसत्तेची पकड फार दृढ व फार अनिवार असून, दर वेळीं तीच बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिवाद, स्वतंत्र चिंतन, सहिष्णुता आदि इहवादी तत्त्वांच्या आड येत असते हे दिसून आलें. हा सर्व संसार अत्यंत दुःखमय असल्यामुळे मनुष्याला कोणा तरी दैवी, अतिमानुष, दयाळू, सर्वसमर्थ अशा शक्तीचा आश्रय अपरिहार्य होऊन बसतो. "जोपर्यंत जगांत दारिद्र्य व दुःख आहे तोंपर्यंत परमेश्वर राहणारच," असें विल् ड्युरंट याने म्हटलें आहे, तें याच अर्थाने. संकटग्रस्त मानवाने अशा दैवी शक्तीचा धांवा केला, जन्मभर तिची उपासना केली, तरी त्यांत हानिकारक असे काही नाही. पण मानवाच्या या वैकल्याचा, या अगतिकतेचा, असहायतेचा फायदा घेऊन स्वतःला धर्मवेत्ते म्हणविणारे लोक त्याला या दुःखातून मुक्ति देण्याचें आश्वासन देऊन धर्माला वाटेल तें विकृत रूप देतात व सर्व मानवी जीवनावर सत्ता स्थापून समाजाला लुटूं पाहतात तेव्हा धर्मसंस्था ही अत्यंत घातक रूप धारण करते.
 मुस्लिम देशांत हेंच झालें. पश्चिम युरोपांत हेंच झालें. सोव्हिएट रशियांत अगदी हेंच नव्हे, पण अशाच प्रकारचें घडलें. बुद्धिवाद, तर्क यांच्या पलीकडचें,