पान:इहवादी शासन.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १२७
 

जहाजांतून अमेरिकेला गेले. नंतरच्या काळांत तेथे अनेक वसाहती स्थापन झाल्या. त्यांतील बहुसंख्य धर्मसुधारकांच्याच होत्या. तरीहि तेथे धार्मिक संघर्ष टळले नाहीत. प्युरिटनपंथीयांना ज्याप्रमाणे प्रोटेस्टंट पाण्यांत पाहत त्याचप्रमाणे प्युरिटन हे क्वेकर- पंथीयांचा तीव्र द्वेष करीत. याच सुमारास रॉजर विल्यम हा एक धर्माधिकारी अमेरिकेंत आला. तो प्युरिटनपंथी होता. पण इतर पंथीयांना धर्मस्वातंत्र्य दिलें पाहिजे, असा उपदेश तो करूं लागला. त्याचबरोबर इंग्लंडच्या राजाची सत्ता अमेरिकेंत चालू नये असेंहि तो प्रतिपादूं लागला. त्यामुळे मासाच्युसेट्सच्या न्यायालयाने त्याला हद्दपार केलें. पण रॉजर विल्यम याने तेथून पळून जाऊन ऱ्होड आयलंड नांवाची नवी वसाहत स्थापन केली.
 विल्यम पेन हा इंग्लिश तरुण क्वेकरपंथीय होता. त्याने अमेरिकेत येऊन पेन्सिल्व्हानिया नांवाची आणखी एक नवी वसाहत स्थापली. क्वेकरपंथीय लोक अंध धर्मसत्ता व राजसत्ता यांना तर विरोध करीतच, पण शिवाय काळे निग्रो व गोरे युरोपीय यांच्यांतहि भेदभाव करूं नये, असेंहि मत तें मांडीत. यामुळे अमेरिकेत त्यांचा भयंकर छळ झाला. त्यांना बर्फावरून फरफटत नेत, तुरुंगांत डांबून ठेवीत आणि फाशीहि देत; पण प्युरिटन, प्रोटेस्टंट, क्वेकर सर्वच ताठर मानेने जुलूम, यातना सहन करीत असल्यामुळे व अमेरिकेत पूर्वपरंपरेचा व म्हणूनच पूर्वग्रहांचा तीव्र जोर नसल्यामुळे लवकरच तेथील जनता विवेकी झाली आणि थॉमस पेन, फ्रँकलिन, वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन तिने राजकीय व इतर सर्व स्वातंत्र्यांची स्थापना केली व आपल्या जीवनाला पूर्ण इहवादी रूप दिलें.

विज्ञानाचा आधार

 आता अमेरिकेप्रमाणेच युरोपांतल्या बहुतेक सर्व देशांनी आपापल्या राष्ट्रीय जीवनांत, राजकारण, अर्थव्यवस्था, शिक्षण, कला या सर्व क्षेत्रांत इहवादी तत्त्वांचा अंगीकार केला आहे. त्या संबंधांत एक महत्त्वाची गोष्ट सांगून हें विवेचन संपवूं. ती गोष्ट ही की, आता पाश्चात्त्य जगांतील धर्महि इहवादी झाला आहे. परमेश्वर हें जगांतील सर्व धर्मांचें मूळ अधिष्ठान आहे. तो परमेश्वर आज विज्ञानाच्या आधारें सिद्ध करण्यांत येतो. परमेश्वराच्या वचनांच्या आधारें पूर्वी भौतिक जगांतील सत्यासत्याचा निर्णय करण्यांत येत असे. आज भौतिकशास्त्रांच्या आधारें परमेश्वराच्या अस्तित्वाविषयीचा निर्णय करण्यांत येतो. जगांतले आजचे बहुतेक सर्व भौतिक शास्त्रज्ञ ईश्वरवादी आहेत.
 सर जेम्स जीनने म्हटलें आहे की, विश्वाचा अभ्यास करतां, असें स्वच्छ दिसतें की, त्यामागे मानवी मनासारखेंच गणिती पद्धतीने विचार करणारें नियामक मन आहे (दि मिस्टीरियस युनिव्हर्स पृष्ठ १४९), एडिंग्टन म्हणतो की, निसर्गशास्त्रामुळे धर्म नष्ट होईल ही कल्पना फोल आहे. फ्रॅन्सिस गाल्टन हा कोणताहि लेख प्रसिद्धीस