पान:इहवादी शासन.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कम्युनिस्ट देशांतील
इहवादी शासन



विषयप्रवेश

 सध्या इहवादी शासनाची सर्वत्र चर्चा चालू आहे. या विषयावर परिसंवाद होत आहेत, ग्रंथ लिहिले जात आहेत आणि मोठमोठे अधिकारी- तज्ज्ञ या विषयाचा आत्मीयतेने खल करीत आहेत. भारताच्या दृष्टीने या सर्वाला फार महत्त्व आहे. भारत हे इहवादी शासन आहे की नाही याविषयी मतभेद आहेत. आपल्या घटनेत 'आमचें शासन इहवादी आहे,' असें म्हटलेले नाही. उलट दोनदा- तीनदा घटना समितींत तशी सूचना आली असतांना ती फेटाळून लावण्यांत आली. पण शब्द तस नसला तरी अर्थ तसा निश्चित आहे, असें अनेक पंडितांचें मत आहे. भारताच्या शासनव्यवहारावर धर्मसत्तेचे वा धर्मवित्राराचें मुळीच वर्चस्व नाही. समाजाच्या उत्कर्षास अवश्य तो कायदा करण्यास, धर्माचा विरोध असला तरी, भारतीय शासन पूर्ण समर्थ आहे, या अर्थाने तें इहवादी आहे, असें हे पंडित म्हणतात. 'इहवादी' याऐवजी निधर्मी असा शब्द लोकांत रूढ आहे. कोणत्याच धर्माची कड न घेणारा व सर्व धर्म सम मानणारा, असा निधर्मी शब्दाचा अर्थ केला जातो. कांही विचारवंत एका निराळ्या दृष्टीने या प्रश्नाकडे पाहतात. भारतीय जनता जोपर्यंत बुद्धिवादी इहवादी व विवेकनिष्ठ झालेली नाही, जोपर्यंत ती परलोनिष्ठ, भौतिकविन्मुख, अंधश्रद्ध व शब्दप्रामाण्यवादी आहे तोपर्यंत, भारताचें शासन इहवादी आहे, या म्हणण्याला त्यांच्या मतें, कांही अर्थ नाही. बहुसंख्य मुस्लिम समाजाचा इहवादाला कडवा विरोध आहे. त्यांच्या त्या वृत्तीमुळेच भारताची फाळणी झाली, आणि राहिलेल्या भारतांतहि आम्हांला सवतासुभा हवा अशी मुस्लिमांची मागणी आहे. या दृष्टीने पाहतां जनता इहवादी झाल्यावांचून शासन इहवादी झालें, या म्हणण्याला कांही अर्थ नाही, या विचारांत बरेंच तथ्य आहे, हें मान्य केलें पाहिजे. भारतांत अजून अनेक सार्वजनिक व शासकीय व्यवहारांच्या प्रारंभीं भूमिपूजन, मंत्रघोष, किवा असेच कांहीं अन्य धार्मिक विधि केले जातात. यावर अनेक