पान:इहवादी शासन.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६ । इहवादी शासन
 

 सामाजिक कराराच्या तत्त्वाचा रूसो हा प्रणेता मानला जातो. व्यक्ति- स्वातंत्र्य, समता व जनतेची सार्वभौमसत्ता आणि याच्या भरीला सामाजिक कराराचें तत्त्व हीं तत्त्वें रूसोने आपल्या अत्यंत प्रभावी शैलीने फ्रेंच जनतेंत प्रसृत केल्यामुळेच क्रांतीचा ज्वालामुखी भडकला व त्यांत फ्रेंच राजसत्तेची आहुति पडली. यामुळे रूसोला सामाजिक कराराच्या तत्त्वाचा उद्गाता म्हणतात तें युक्तच आहे. पण त्याच्या आधी शंभर वर्षांपासून हॉब्स व लॉक हे इंग्लिश राज्यशास्त्रज्ञ या तत्त्वाचें प्रतिपादन करीत होते. या प्रत्येकाच्या प्रतिपादनाच्या तपशिलांत फार मतभेद होते. पण राजसत्ता ईश्वरदत्त नाही, ती सामाजिक करारानेच शास्त्याला लाभते, याविषयी मतभेद मुळीच नव्हता.

बुद्धिवादाचें युग

 त्याचप्रमाणे व्यक्ति-स्वातंत्र्य, मुद्रण-स्वातंत्र्य. जनतेची सार्वभौम सत्ता, सामाजिक समता, घटनाबद्ध शासन याविषयीहि कोणाचें दुमत नव्हतें. अठराव्या शतकाच्या प्रारंभी या तत्त्वांच्या प्रतिपादनास इंग्लिश राज्यशास्त्रज लॉक याने प्रारंभ केल्यावर पुढे ह्यूम, रूसो, व्हॉल्टेअर, माँटेस्क, थॉमस पेन यांसारख्या थोर शास्त्रज्ञांनी अनेक ग्रंथ लिहून अनेक प्रकारांनी तीं तत्त्वें जनतेंत दृढमूल करून टाकली आणि राजकारणांतून दैवी सत्तेच्या तत्त्वाचा उच्छेद करून त्याला पूर्ण इहनिष्ठरूप दिलें. यामुळेच अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून बुद्धिवादाचें युग (एज् ऑफ रीझन) सुरू झालें, असे इतिहासकार म्हणतात. या दृष्टीने थॉमस पेन याच्या 'राइटस् ऑफ मॅन' व 'एज् ऑफ रीझन' या दोन ग्रंथांचें अनन्य महत्त्व आहे. फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका या तीनहि देशांत या ग्रंथांनी प्रचंड क्षोभ निर्माण केला. अमेरिकेच्या क्रांतीप्रमाणेच फ्रेंच राज्यक्रांतीमागचीहि थॉमस पेन (१७३७- १८०९) ही एक प्रेरक शक्ति होती. धार्मिक सत्ता, राजसत्ता यांची जीं कांही बंधनें या काळपर्यंत लोकांच्या मनावर होतीं तीं सर्व या ग्रंथांनी तोडून टाकलीं व मानवी मन शब्दप्रामाण्याच्या, धर्मसत्तेच्या व असहिष्णुतेच्या युगांतून उचलून बुद्धिप्रामाण्याच्या, लोकसत्तेच्या धर्म- समानत्वाच्या बुद्धिवादाच्या युगांत आणून ठेवलें.
 पश्चिम युरोपच्या या कथेंत अमेरिकेतील इहवादाचा विचार कोठे आणलेला नाही. कारण तो विषयाच्या कक्षेच्या बाहेर आहे. पण अमेरिका ही इहवादी पक्षाची प्रारंभापासूनच फार मोठी शक्ति असल्यामुळे व तत्त्वतः तिचा पाश्चात्त्य देशांत अंतर्भाव होत असल्यामुळे तेथील इहवादाचा अगदी थोडक्यांत येथे परामर्श घेऊन मग पुढे जाऊं.
 अमेरिकन वसाहतींचा जन्मच मुळी युरोपांतील धर्मक्रांतींतून झालेला आहे. इंग्लंडमध्ये जेम्सच्या कारकीर्दीत तसा धर्मच्छळ नव्हता, पण प्युरिटन पंथाला मात्र स्वातंत्र्य नव्हतें. त्यामुळे अनेक प्युरिटनपंथी लोक १६२० साली मे फ्लॉवर नामक