पान:इहवादी शासन.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १२५
 

असे. अशा स्थितीत भांडवलशाहीचा विकास होणें शक्य नव्हतें. प्रोटेस्टंट धर्माचेहि यम-नियम, आचार- विचार, बंधनें, वर्ज्यावर्ज्य फार होतें. देहदंडन, कष्ट, तापसी वृत्ति यांना त्या पंथांत फार महत्त्व होतें. पण त्यांनो धनोद्योग वर्ज्य न मानल्यामुळे या कष्टाळू, उद्योगी व काटकसरी वृत्तीचा भांडवलशाहीला फायदाच झाला. कारण त्या वृत्तीशिवाय, अपार कष्टाशिवाय, भांडवलशाहीला यश आलें नसतें.

प्रोटेस्टंट पंथाचे कार्य

 सोळाव्या शतकाच्या अखेरीस एक जो नवा व्यापारी व उद्योगी वर्ग निर्माण झाला व मानाने जगूं लागला त्याचें श्रेय अनेक पंडितांच्या मतें, प्रोटेस्टंट पंथाला आहे; या मताचा मोठा पुरस्कर्ता लेकी हा होय. तो गेल्या शतकांत होऊन गेला. या विसाव्या शतकांत हा विचार पुन्हा अत्यंत प्रभावीपणे मांडणारा पंडित म्हणजे मॅक्सवेवर (१८६४- १९२०) हा होय. 'प्रोटेस्टंट एथिक अँड दि स्पिरिट ऑफ कॅपिटॅलिझम' या आपल्या प्रबंधांत त्याने हाच विचार विवरून सांगितला आहे. साधारणतः धर्मपरायण लोक ऐहिक व्यवहाराविषयी विशेषतः आर्थिक उद्योगाविषयी, उदासीन असत आणि धनोद्योगी लोक धर्मनीति फारशी पाहत नसत. पण प्रोटेस्टंट पंथाने या धनोद्योगी लोकांना उत्तेजन देऊन धर्मकक्षेत स्थान दिल्यामुळे केवळ सुखोपभोग हेंच आपलें उद्दिष्ट मानणारा हा मध्यमवर्ग, इह व पर दोन्ही साधणें शक्य आहे हें ध्यानीं येतांच मोठ्या आनंदाने प्रोटेस्टंट पंथांत आला व दीर्घोद्योग, अविरत कष्ट, अर्पण- वृत्ति हे आपले गुण त्याने अर्थ-व्यवसायांत आणले आणि कॅपिटॅलिझमला चालना मिळून सर्व नवे उद्योग- व्यवसाय यशस्वी झाले, असा मॅक्सवेवरच्या प्रतिपादनाचा भावार्थ आहे.
 अर्थव्यवस्थेप्रमाणेच राजकारणहि आता ऐहिक होऊं लागलें आहे. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धांत राष्ट्रभावना उदयास आली तेव्हाच राजकारणाला इहवादी रूप प्राप्त होऊं लागलें होतें. पण त्या वेळीं देवदत्त राजसत्तेचें तत्त्व उदयास आल्यामुळे इहवृत्तीचा विकास तितकासा होणें शक्य नव्हतें. व्यक्तिवाद, जनतेची सार्वभौम सत्ता या तत्त्वांचा चार-दोन तत्त्ववेत्त्यांच्या पलीकडे तेव्हा मुळीच प्रसार झाला नव्हता. आता त्या तत्त्वांचा सर्वत्र पुरस्कार होऊं लागला. सामाजिक कराराच्या तत्त्वाचा उदय म्हणजे दैवी सत्तेचा संपूर्ण लोप होय. मानव निसर्गतः स्वतंत्र व सम असून, समाजाच्या रक्षणासाठी त्याने राजाशी करार करून त्याला कांही सत्ता, कांही अधिकार दिले व तितक्यापुरती स्वतःवर कांही कायद्याचीं बंधने घालून घेतली, असा या करारतत्त्वाचा (सोशल कॉंट्रॅक्ट) अर्थ आहे. यांत कोठल्याहि राजाच्या किंवा पोपच्या दैवी सत्तेचा, देवदत्त अधिकाराचा संबंध नाही, हें उघड आहे. त्यामुळे येथूनच राजकारणाचें ऐहिकीकरण होण्यास प्रारंभ झाला.