पान:इहवादी शासन.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४ । इहवादी शासन
 


औद्योगिक क्रांति

 आणि युरोपच्या गेल्या दोन शतकांच्या इतिहासांत सर्व क्षेत्रांत हेंच मन्वंतर घडून येत असल्याचे दिसून येतें. भांडवलशाहीचा उदय, विकास आणि परिणति ही गेल्या दोन शतकांतलीच आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये व नंतर सर्व पश्चिम युरोपांत औद्योगिक क्रांति झाली व तींतूनच भांडवलशाही निर्माण होऊन अपार धनसमृद्धि प्राप्त करून घेणं मानवाला शक्य झालें. ही औद्योगिक क्रांति व भांडवलशाही धर्मक्रांतीवांचून जन्माला येणें शक्य नव्हते, असें अनेक पंडितांचे मत आहे. डब्ल्यू. इ. एच्. लेकी याने 'रॅशनॅलिझम् इन युरोप' या आपल्या ग्रंथांत 'दि इंडस्ट्रियल हिस्टरी ऑफ रॅशनॅलिझम' या प्रकरणांत हा विचार स्पष्ट करून मांडला आहे. त्याने आपल्या ग्रंथांत 'राजकारणाचें ऐहिकीकरण' (सेक्युलरायझेशन) 'अर्थव्यवस्थेचे ऐहिकीकरण' अशींच या प्रकरणांना नांवें दिली आहेत. त्यावरून बुद्धिवादाचा, कार्यकारणभावाचा, इहवादाशी कसा अविभाज्य संबंध आहे ते ध्यानीं येईल.
 तो म्हणतो की, ख्रिस्ती धर्माने धनाचा, अर्थार्जनाचा नेहमीच निषेध केला आहे आणि धनार्जनाची जबर आकांक्षा ही तर भांडवलशाहीची मुख्य प्रेरणा आहे. शिवाय ख्रिस्ती धर्माला व्याजबट्टा मंजूर नाही. व्याज घेणें ही तो धर्म- चोरीच समजतो. यामुळेच त्या काळांत सावकारी हा धंदा प्राधान्याने ज्यू लोकांच्या हातीं होता. कारण त्यांना ख्रिस्ती धर्मबंधनें लागू नव्हती. स्पेन, फ्रान्स हे देश कॅथॉलिक धर्माच्या वर्चस्वाखाली नसते, तर त्यांना व्यापार व उद्योग यांचं महत्त्व समजलें असतें व त्यांनी मूर, ज्यू व ह्युगेनॉटस् यांना हाकलून देऊन आत्मघात करून घेतला नसता. प्रोटेस्टंट धर्म ज्यांनी स्वीकारला होता त्या इंग्लंड, हॉलंड या देशांनी वरील लोकांना उदार आश्रय देऊन आपला फायदा करून घेतल्याचें वर सांगितलेच आहे. अर्थशास्त्र व भौतिक विज्ञान यांची अठराव्या शतकांत वाढ झाली. तेव्हा शेती हाच धंदा श्रेष्ठ व कारखानदारी हा हीन व्यवसाय होय हा रूढ सिद्धान्त पदभ्रष्ट झाला व भांडवलशाहीचा मार्ग मोकळा झाला. तेव्हा राष्ट्रसंघटनेला ज्याप्रमाणे धर्मक्रांति अवश्य होती त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीला व भांडवलशाहीच्या उदयासाठीहि त्या प्रोटेस्टंट धर्मक्रांतीची आवश्यकता होती.
 जीन काल्व्हिन हा लूथरप्रमाणेच प्रोटेस्टंट धर्मक्रांतीचा अध्वर्यु होता. त्याचा चरित्रकार म्हणतो की, भांडवलशाहीच्या विकासाचें श्रेय बऱ्याच अंशी काल्व्हिनला आहे. व्याजबट्ट्यावरची बंदी त्याने काढून टाकली. पण त्यापेक्षाहि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यापार, कारखाने, पेढी या उद्योगांना त्याने नैतिक अधिष्ठान निर्माण करून दिले. जुन्या धर्माने त्यांना निद्य मानलें होतें. ख्रिस्ती लोकांना तें वर्ज्य केलें होतें. त्यामुळे जरी कांही लोक तो व्यवसाय करीत असले तरी लोक त्यांना अनाचारी मानीत आणि त्यांना स्वतःलाच पुष्कळ वेळा आपण हीनव्यवसायी आहोंत, असें वाटत