पान:इहवादी शासन.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १२३
 

सालीं जर्मनीचा जन्म झाला. हाती सत्ता येतांच बिस्मार्कलाहि प्रथम कॅथालिकांविरुद्ध कायदे करावे लागले. त्या धर्मगुरूंची अंधसत्ता नष्ट झाल्यावांचून कोणतीहि प्रगति शक्य नाही हें त्याच्या ध्यानीं आलें होतें. कॅथॉलिक पक्ष नव्या पार्लमेंटांत बराच प्रबळ होता. पोपचें वर्चस्व जर्मनीवरच नव्हे तर सर्व युरोपांत पुन्हा प्रस्थापित व्हावे, असे त्या पक्षाचे प्रयत्न होते. पहिल्याच बैठकींत, बादशहांना मानपत्र देण्याचा ठराव आला तेव्हा बादशहांनी "ऐहिक व्यवहारावरहि पोपचें वर्चस्व युरोपांत पुन्हा प्रथापित करण्यास पोपला साह्य केलें पाहिजे या अटीवरच आम्ही मानपत्राच्या ठरावाला संमति देऊं," असें त्यांनी सांगितलें. अर्थात् ती अट मान्य झाली नाही. याच साली कोलोन येथील आर्चबिशप याने असें फर्मान काढले की, "बॉन विद्यापीठांतील प्राध्यापकांनी, पोप हे सर्वज्ञ आहेत, प्रमादातीत आहेत हा सिद्धान्त मान्य केला पाहिजे." सरकारने हें फर्मान रद्द केलें पण कॅथॉलिक धर्मगुरूंना जर्मनीला पुन्हा तमोयुगांत न्यावयाचें होतें, तें यावरून स्पष्ट दिसतें.
 स्पेन, पोलंड, ऑस्ट्रिया, बोहेमिया इत्यादि देशांत जेसुइटांना तेथल्या राजसत्तेने पाठिंबा दिला म्हणूनच त्या देशांचा अपकर्ष झाला. जर्मनींतहि तेंच झालें असतें. कारण पोप सर्वज्ञ आहे प्रमादातीत आहे, हें मत स्वीकारणें म्हणजे मानवी प्रज्ञेची जाणूनबुजून हत्या करण्यासारखेंच आहे. प्रिन्स बिस्मार्कने तें स्वीकारलें नाही म्हणूनच जर्मनी प्रगतिपथ आक्रमू शकला. १८७२ साली जर्मनीने पोपच्या दरबारी वकील म्हणून कार्डिनल प्रिन्स होहेन लो याची नेमणूक केली. पण पोपने त्याला दरबारी येण्यास मनाई केली. त्यासंबंधी भाषण करतांना बिस्मार्क म्हणाला की, "आम्ही पोपचें वर्चस्व कधीहि मान्य करणार नाही. आपण हें ध्यानांत ठेवा की, आम्ही कॅनोसाला कधीहि जाणार नाही" (जर्मन सम्राट् चौथा हेन्री याला १०७७ सालीं कॅनोसा या गावी जाऊन, पोपपुढे गुडघे टेकून माफी मागावी लागली होती. तेव्हापासून कॅनोसाला जाणें म्हणजे पोपपुढे गुडघे टेकून शरणागति पत्करणें असा अर्थ रूढ झाला.) बिस्मार्कचे हे उद्गार चिरस्मरणीय व्हावे म्हणून लोकांनी हार्झबर्ग येथे एक स्तंभ उभारून त्यावर ते कोरून ठेवले आहेत. जनतेचा असा पाठिंबा होता म्हणूनच पोपची अंधसत्ता बिस्मार्क नष्ट करूं शकला. चौथ्या हेन्रीला तें शक्य नव्हतें. कारण पोपकडून त्याला माफी मिळाली नसती, तर तो सम्राट्पदी राहू शकला नसता. बिस्मार्कच्या कॅथॉलिकविरोधी धोरणामुळे व कायद्यामुळे कॅथॉलिकांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. तेव्हा त्या खुनी इसमाने जाहीरपणें सांगितलें की, "तुम्ही कॅथॉलिकांविरुद्ध कायदे केले म्हणूनच मी तुमच्यावर गोळी झाडली." यावरून पोप व त्याचे अनुयायी हे राष्ट्रसंघटनेचे कायमचे शत्रु होते, हें उघड आहे. आणि बहुसंख्य जर्मन जनता त्यांच्या धार्मिक सत्तेच्या पकडींतू मुक्त झाली होती म्हणूनच जर्मन राष्ट्राची घडण होऊ शकली यांतहि शंका नाही.