पान:इहवादी शासन.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२ । इहवादी शासन
 

नव्हतें. त्याने पोपवर दाब ठेवण्यासाठी आपलें लष्करच रोमला आणून ठेवलें होतें. अर्थात् पोपला कांहीच करणें शक्य नव्हतें. तरीहि पोपने अल्पकाळ जो राष्ट्रतत्त्वाला पाठिंबा दिला त्याचा फार उपयोग झाला. इटलींतील अनेक सरदार, संस्थानिक व बहुसंख्य जनता यांची पोपवर एकांतिक निष्ठा होती. त्याने राष्ट्रभावनेला पाठिंबा दिल्यामुळेच हे सर्व लोक राष्ट्रीय चळवळींत सामील झाले. त्याचा हा ओझरता आशीर्वाद मिळाला नसता, तर चळवळीला इतकें यश आलें नसतें, असें फिशरसारख्या इतिहासकाराने म्हणून ठेवलें आहे. (हिस्टरी ऑफ युरोप, पृष्ठ ९१४).
 काव्हूर हा १८५० साली इटलींतील पिडमांट या संस्थानाचा राजा व्हिक्टर इमॅन्युएल याचा मुख्य प्रधान झाला. आणि त्याने पहिली गोष्ट केली ती ही की, त्याने प्रथम पाद्रीवर्गाविरुद्ध कायदे करून त्याचें वर्चस्व नष्ट करून टाकले. त्यावांचून सामाजिक, आर्थिक, धार्मिक कोणतीच सुधारणा करणें त्याला शक्य नव्हतें. हे कायदे संमत झाले तेव्हापासून एका महिन्याच्या आंत राजाची आई, बायको व भाऊ हे सर्व मृत्युमुखी पडले. त्याबरोबर या कायद्यामुळेच, धर्मपीठाला विरोध केल्यामुळेच, ही आपत्ति आली असा सर्वत्र ओरडा झाला व काव्हूरला राजीनामा द्यावा लागला. पण डी आझेग्लिओ या पूर्वीच्या एका मंत्र्याने राजाची समजूत घातली तेव्हा त्याने काव्हूरला पुन्हा सत्ता सत्ता दिली.
 व्हिक्टर इमॅन्युएल याने हा समंजसपणा, हा विवेक दाखवला नसता, पाद्रयांचा शाप आणि आप्तांचा मृत्यु यांत कार्यकारण भाव नाही हें त्याला पटलें नसतें, त्याच्या मनावरची धर्मचमत्काराची मिठी सुटली नसती, तर इटलीची राष्ट्रसंघटना पुढल्या दहा वर्षांत जी काव्हूरने घडवून आणली ती साधली नसती. इहवादावांचून राष्ट्रसंघटना नाही या वाक्याचा अर्थ यावरून ध्यानीं येईल. काव्हूरने पिडमाँट संस्थानचा जर्मनींतील प्रशियाप्रमाणे कायाकल्प केला, आणि त्या संस्थानानेच इटलीच्या सर्व शक्ति एकात्म करून तें राष्ट्र जन्माला आणलें असा इतिहास आहे.

विस्मार्कचें कार्य

 इटलीतील पिडमाँटने जें साधलें तेंच जर्मनींतील प्रशियाने साधलें. आधीच्या शतकांत फ्रेडरिक दि ग्रेट याने प्रशियाला आधुनिक युगांत आणून ठेवलें होतें हे मागे सांगितलेच आहे. याच प्रशियाचा मुख्य प्रधान प्रिन्स बिस्मार्क याने काव्हूरचा आदर्श पुढे ठेवून जर्मन राष्ट्र संघटित केलें. १८६६ साली त्याने ऑस्ट्रियाचा व १८७० साली फ्रान्सचा रणांगणांत पराभव केला. त्यामुळे सर्व जर्मन संस्थानिक (त्या वेळी ३९ संस्थानें होतीं) जर्मनी एकात्म एकछत्री करण्यास अनुकूल झाले आणि १८७०