पान:इहवादी शासन.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १२१
 

पदवीला पोचले. हें ऐकायला जरा विचित्र वाटतें. तेराव्या शतकांतच युरोपांत राष्ट्रभावना उदयास आली व पोपच्या अनियंत्रित धर्मांध सत्तेला तिनेच हादरा दिला, असें प्रारंभी सांगितलें आहे. असें असतांना जर्मनी व इटली या प्रारंभापासून प्रगतीच्या आघाडीवर असलेल्या देशांना राष्ट्र म्हणून संघटित होण्यास पांचशे वर्षे लागावीं याचा अर्थ काय ? अंध धर्मसत्ता या दोन्ही देशांचे संघटित होण्याचे प्रयत्न सारख्या हाणून पाडीत होत्या, हा याचा साधा अर्थ आहे. रोमच्या पोपला राष्ट्र हें तत्त्वच मान्य नव्हतें. अखिल ख्रिस्ती जगत् एक व त्याचे आपण स्वामी, हें त्याचें कायमचें स्वप्न होतें. शिवाय इटली राष्ट्र म्हणून संघटित झाले, तर तेथे इंग्लंडप्रमाणे पार्लमेंट येईल किंवा फ्रान्सप्रमाणे राजघराण्याची सत्ता यईल ही पोपला भीति होती. मग सार्वभौम सत्ता त्याच्या हातीं राहिली नसती. हें दिसत असल्यामुळे राष्ट्रसंघटनेच्या प्रयत्नांत रोमन धर्मपीठ कायम बिब्बा घालीत असे. शिवाय इटलीच्या कांही भागांवर ऑस्ट्रेलियन साम्राज्यसत्ता होती. कांही भाग स्पेनच्या ताब्यांत होते व या दोन्ही सत्ता अंध कॅथॉलिकधर्मी असल्यामुळे त्या त्या प्रदेशांत धर्मसुधारणा किंवा इतर भौतिक प्रगति होणें शक्यच नव्हतें. जर्मनीवर पोपची प्रत्यक्ष सत्ता नव्हती, पण तेथे पवित्र रोमन साम्राज्याची सत्ता होती व तें साम्राज्य कायमचें पोपच्या छायेंत होतें. इ. स. ८०० मध्ये रोमच्या पोपने जर्मन राजा शार्लमेन याला पवित्र रोमन सम्राट् म्हणून अभिषेक केला. तेव्हापासून तें साम्राज्य प्रत्यक्षांत कधीहि अस्तित्वांत नव्हतें तरी त्या कल्पनेचें भूत जर्मन राजांच्या मानगुटीला कायमचें बसलें होतें.
 या दोन्ही सत्तांना नेपोलियनच्या स्वाऱ्यांमुळे हादरे बसले. रोमन साम्राज्य तर १८०६ सालीं नेपोलियनने कायमचें नष्ट केलें. इटलीत ऑस्ट्रिया व स्पेन यांच्या सत्ताहि त्याने कांही काळ नष्ट केल्या. त्या फिरून प्रस्थापित झाल्या हें खरें. पण याच्या स्वाऱ्यांबरोबर समता, स्वातंत्र्य, बंधुता, जनतेचें सार्वभौमत्व, प्रजासत्ताक राज्य, इत्यादि क्रांतिकारक तत्त्वांचे वारे इटलीत शिरले यामुळे या दोन्ही देशांत अंध धर्मसत्ता कमजोर झाली, ढिलावली आणि म्हणूनच गेल्या शतकांत ते देश राष्ट्र म्हणून संघटित होऊ शकले.

धर्मसत्तेवर हल्ले

 मॅझिनी, काव्हूर व गॅरिबाल्डी हे इटलीचे तिघेहि राष्ट्रवीर पोपच्या सत्तेचे हाडवैरी होते. मॅझिनीने आपल्या लेखणीने, गॅरिबाल्डीने आपल्या तलवारीने व काव्हूरने आपल्या मुत्सद्देगिरीने धर्मसत्तेवर प्रखर हल्ले चढवून, इटलींत राष्ट्रभावना जागृत केली. १८४६ च्या सुमारास रोमन पीठावर आलेला पोप पायस हा बराचसा पुरोगामी होता. त्याने उदारमतवादाला व राष्ट्रसंघटनेला वेळोवेळी पाठिवाहि दिला होता. पण ऑस्ट्रियन सम्राटाला हें खपवून घेणें शक्य