पान:इहवादी शासन.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ११९
 

ओढवून घेतलें. १६१८ साली हें युद्ध सुरू झालें व १६४८ साली संपलें. प्रथम तें कॅथॉलिक व प्रोटेस्टंट संघांत चालू होतें. पण नंतर त्याला राजकीय स्वरूप येऊन फ्रान्स, स्वीडन, हॉलंड सर्वच त्यांत पडले. मात्र दर वेळीं युद्ध जर्मन भूमीवर होत होतें.
 या तीस वर्षात जर्मनीचें अक्षरशः स्मशान झालें. तीस वर्षे त्या भूमींत रक्तपात, विध्वंस, जाळपोळ, लूट यांचे थैमान चालू होतें. अत्याचार, अनाचार यांना ऊत आला होता. दारिद्र्य, भूकमार इतकी झाली की, कोठे कोठे नरमांस- भक्षणहि घडूं लागलें. आणि हें सर्व धर्मासाठी ! सोळाव्या शतकाच्या प्रारंभी जर्मनी संस्कृतिप्रगतीच्या दृष्टीने युरोपच्या अग्रभागी होता. तीस वर्षे युद्धाच्या अखेरीस तो पुन्हां रानटी अवस्थेला येऊन पोचला. जेसुइट सम्राट् फर्डिनांड दुसरा या सर्वाला कारण ! (फिशर, पृष्ठे ६१२).
 पण एवढें युद्ध होऊनहि प्रोटेस्टंटांनी लढा सोडला नाही. युद्धांत सम्राटाला नमतें घेऊन उत्तर जर्मनीला धर्मस्वातंत्र्य द्यावें लागलें. बोहेमिया, ऑस्ट्रिया व त्या साम्राज्यांतले सर्व प्रदेश मात्र त्याच्या मगरमिठींत तसेच राहिले. ते जेसुइटांच्या स्वाधीन करून धर्मसुधारणेचा निःपात करण्याचें त्याने आपले स्वप्न तेथे प्रत्यक्षांत आणलें. पण उत्तर जर्मनींत धर्मस्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य हीं कायम राहिल्यामुळे त्यांतूनच पुढे प्रशियाचा उदय झाला आणि फेडरिक दि ग्रेट याला जर्मनीचें भवितव्य बदलून टाकण्याची संधि प्राप्त झाली. १७४० साली सत्तारूढ होतांच त्याने सर्व धर्मपंथांना स्वातंत्र्य देऊन टाकलें. तो स्वतः अज्ञेयवादी होता; धर्मकलह त्याला बालिश वाटत. त्यामुळे प्रशियांत इहवादी शासन स्थापन होऊन त्याची सर्व दृष्टींनी प्रगति झाली आणि पुढल्या शतकांत याच प्रशियाने सर्व जर्मनी संघटित करून त्याला राष्ट्रपदवी प्राप्त करून दिली !

समन्वयी धर्म

 या धार्मिक यादवींच्या प्रलयांतून पूर्णपणे नव्हे, पण बव्हंशी मुक्त राहिला तो देश म्हणजे इंग्लंड. ट्यूडर राजा आठवा हेन्री याने खाजगी कारणाने १५३४ सालीं पोपच्या धर्मपीठाचा संबंध तोडून टाकला व तेव्हापासून सुधारक पंथाला त्या भूमींत अवसर लाभू लागला. मध्यंतरी पांच- सहा वर्षे हेन्रीची मुलगी मेरी हिच्या राज्यांत पोपची सत्ता प्रबळ झाली होती. त्या अवधीत सहा-सातशे सुधारकांना तिने जाळून मारलें. पण १५५९ साली एलिझाबेथ गादीवर आली. तिने दोन्ही धार्मिक अतिरेकी पक्ष बाजूला ठेवून इंलंडचा म्हणून स्वतंत्र समन्वयी धर्म स्थापन केला व पोपचें वर्चस्व कायमचें नष्ट करून टाकले. यामुळे संतापून जाऊन पोपने एलिझाबेथवर बहिष्कार पुकारला. पण आता त्याला इंग्लंडमध्ये कोणी कवडीचीहि किंमत दिली नाहीं. अंध धर्मसत्तेच्या जोखडापासून इंग्लिश जनता मुक्त झाल्याचेंच हें लक्षण होय.