पान:इहवादी शासन.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८ । इहवादी शासन
 

यांसारखे झुंजार तत्त्ववेत्ते फ्रान्समध्ये निर्माण झाले. त्यामुळे फान्सची प्रज्ञा जिवंत राहूं शकली आणि फ्रेंच राज्यक्रांति घडून येऊन सर्वच क्षेत्रांत पुराणमतवादाच पाया हादरून गेला.
 फ्रेंच धीरपुरुषांनी, क्रांतिकारकांनी, शास्त्रज्ञांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा लढा अखंड चालू ठेवल्यामुळे स्पेन-पोलंडसारखीं फ्रान्सची स्थिति झाली नाही हें खरें; पण त्या संग्रामांत त्यांची शक्ति खर्च झाल्यामुळे व लोकमत बव्हंशी जेसुइटांच्या वर्चस्वाखाली विवेकहीन राहिल्यामुळे फ्रान्समध्ये सुस्थिर व बलशाली लोकसत्ता अवतरूं शकली नाही. पहिलें व दुसरें महायुद्ध- दोन्ही युद्धांत फ्रान्स आत्मसंरक्षण करूं शकले नाही. महायुद्धानंतरहि डी गॉल याला पाचारण करून त्याच्या हातीं फ्रेंचांना दंडसत्ता द्यावी लागली. गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत फ्रेंच खरे विवेकवादी, इहवादी झालेच नव्हते त्याचे हे परिणाम आहेत.
 एमिल झोला याची ट्रुथ ही कादंबरी व ड्रायफस प्रकरणी त्याने केलेली भाषणें व लेख हे पाहतां या काळपर्यंत फ्रेंच जनमानसावर जेसुइटांची केवढी सत्ता होती हें कळून येतें. जेसुइट हा जसा धर्मांध तसा अघोरी पंथ आहे. न्याय-नीति, सत्य-असत्य याचा त्यांना विधिनिषेध नाही. धर्माच्या प्रगतीसाठी असत्य, खून, रक्तपात करण्यास कांही हरकत नाही, असें त्यांचें शास्त्र आहे. पास्कल हा सतराव्या शतकांतला मोठा फ्रेंच गणिती व तत्त्ववेत्ता. त्याने 'प्रॉव्हिन्सियल लेटर्स' या आपल्या पत्रकांतून अत्यंत उपरोधिक भाषेत जेसुइटांचे काळेकुट्ट अंतरंग फ्रेंचांना उघडे करून दाखविलें होतें. तरीहि फ्रेंच जनता फारशी विवेकी झाली नाही. ड्रायफस या ज्यू लष्करी अधिकाऱ्यावर जेसुइटांनी खोटे आरोप केले तेव्हा ती इतकी अंध, विकवेशून्य झाली की, सोळाव्या शतकांतील धर्मयुद्धांची पुन्हा आठवण व्हावी. अशा या अंध, असहिष्णु अविवेकी वृत्तीमुळे राष्ट्रनिष्ठा व लोकशाही या कायमच्या दुबळ्या राहून देश कायमचा दुबळा राहिला तर त्यांत नवल काय ? (फ्रान्स- हडलस्टन्, पृष्ठे १०, ९८) .

जर्मनीतील संग्राम

 जर्मनीचा इतिहास असाच कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांच्यांतील यादवीने भरला आहे. लूथरकृत धर्मक्रांतीनंतर जर्मनीची उत्तर जर्मनी व दक्षिण जर्मनी अशी फाळणी झाली. उत्तरेकडचे संस्थानिक प्रोटेस्टंट व दक्षिणेचे कॅथॉलिक यांचे दोन संघ झाले व यादवीला प्रारंभ झाला. पण १५५५ साली ऑगसबर्ग येथे तह होऊन प्रत्येक संस्थानाला धर्मस्वातंत्र्य देण्यांत आलें. सम्राट् फर्डिनांड पहिला यानेहि त्याला मान्यता दिली. यामुळे जर्मनीला पन्नास वर्षे शांतता मिळाली. त्यानंतर स्टिरियाचा राजा सम्राट् झाला. हा पक्का जेसुइट होता हें वर सांगितलेच आहे. त्याने प्रोटेस्टंटांचा उच्छेद करायचा विडा उचलला व त्यापायीं तीस वर्षे युद्ध