पान:इहवादी शासन.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ११७
 

धर्मस्वातंत्र्याचें धोरण कायम राखल्यामुळे फ्रान्सची त्या काळांत इतकी प्रगति झाली की, त्या काळाला सुवर्णयुगच म्हणतात.
 कॉनेली, रेसिन, मोलियर हे नाटककार याच काळांतले. पास्कल, डेकार्ट हे तत्त्ववेत्ते याच काळांतले. फरमाट, डिमॉयरे हे गणितीहि याच काळांतले. रेसिन, मोलियर यांसारखे नाटककार उदयास येऊ शकतात याला फार अर्थ आहे. 'बुद्धिवादाचा उदय' या आपल्या ग्रंथांत लेकी याने म्हटले आहे की, नाट्य ही अत्यंत प्रभावी कला ख्रिस्ती धर्माने नष्ट करून टाकली होती. नट-नटी यांना चर्च धर्मबाह्य समजत असे. पण बुद्धिवादी तत्त्ववेत्ते त्या कलेचा फार आदर करीत. व्हाल्टेअरच्या काळची एक नटी अड्रिनी लेकव्हरर हिच्या अंतकाळीं धर्माचार्य तिला सांगू लागले की, जन्मभर मी पाप करीत आलें, असें तूं कबूल कर. पण त्या नटीला आपल्या कलेचा अभिमान होता. तिने नकार दिला तेव्हा शेवटचे मंत्र न म्हणतांच आचार्य निघून गेले व मृत्यूनंतर तिच्या कबरीवर क्रॉस ठेवण्यांत आला नाही ! तेव्हा अंध धर्मसत्ता ही विज्ञानसंशोधनच फक्त नष्ट करतें असें नव्हे, तर सर्व कला आणि नाट्यकला विशेषतः तिच्या विषारी छायेंत कोळपून जातात. स्वतंत्र प्रज्ञेचीच एकदा हत्या झाली की विद्या काय, कला काय, उद्योग काय आणि कृषि काय- सर्वांचा मृत्यु ओढवायचा.

शहाणा सुलतान

 चीदावा लुई हा सुलतान होता. अनियंत्रित होता. पण तो प्रारंभी फार शहाणा व सहिष्णु होता. १६६४ साली त्याने सायन्स ॲकेडमीची स्थापना केली. पुढील वर्षी संगीत विद्यापीठ स्थापले. कोलवर्ट या प्रधानाला पूर्ण स्वातंत्र्य देऊन उद्योग-व्यापार यांची पुनर्घटना केली व फ्रान्सला समृद्ध केलें. पण १६८५ सालीं, एका रखेलीच्या आहारी जाऊन त्याने 'एडिक्ट ऑफ् नॅटीस' रद्द केला व ह्यूगेनॉटस् लोकांचें धर्मस्वातंत्र्य नष्ट करून, पुन्हा त्यांचे हत्याकांड सुरू केलें. हे ह्यूगेनॉटस् मोठे कारागीर होते, व्यापारी होते, कारखानदार होते, उद्योगपति होते. पण धर्मस्वातंत्र्य गेल्यामुळे लक्षावधि ह्यूगेनॉटस् मायभूमि सोडून इंग्लंड, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड या देशांत गेले. फ्रेंच इतिहासकार मिकेलेट म्हणतो, "ते गेल्यामुळे कोलबर्टची सर्व अर्थव्यवस्था कोसळून पडली आणि फ्रान्स दरिद्री झाला." आणि उलट वरील प्रोटेस्टंट सहिष्ण देशांनी त्यांचें स्वागत करून त्यांना सर्व प्रकारच्या सवलती दिल्यामुळे त्यांच्य व्यापाराची, उद्योगाची, कारागिरीची सर्वतोपरी भरभराट झाली.
 याच सुमारास लुईराजाने आक्रमक युद्धे सुरू केली. पण अर्थव्यवस्था ढासळली असल्यामुळे प्रत्येक वेळीं फ्रान्सचा पराभव झाला आणि सुवर्णयुगांतले सर्व वैभव रसातळाला गेलें. पुढे अठराव्या शतकांत धार्मिक जुलूम, धर्मच्छळ, धर्माचार्यांची अरेरावी हें सर्व चालू होतें. पण त्याच शतकांत रूसो, व्हॉल्टेअर, मॉंटेक्स, डिडेरो