पान:इहवादी शासन.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६ । इहवादी शासन
 


सुधारकांचे मनोधैर्य

 फ्रान्स व जर्मनी या देशांतील धर्मक्रांतीचा इतिहास खूपच वेगळा आहे. तेथेहि जेसुइट आणि कॅथॉलिक राजसत्ता त्यांनी भयंकर धर्मच्छळ केला, सुधारकांवर अनन्वित अत्याचार केले, कत्तली केल्या, पण या सर्व यमयातना सोसूनहि त्या अंध धर्मसत्तेचा प्रतिकार करण्याचे मनोधैर्य तेथील सुधारकांनी शेवटपर्यंत प्रकट केलें व त्या संग्रामांत ते अखेरपर्यंत लढत राहिले. म्हणून त्या देशांत बुद्धिस्वातंत्र्य, सहिष्णुता, विवेकनिष्ठा, स्वतंत्र चिंतन आणि त्यामुळेच मानवी कर्तृत्व टिकून राहिलें व कधी कधी बहरास आले. या देशांत कधी कधी राजसत्तेनेहि विद्या- कलांचा व धर्मस्वातंत्र्याचा पुरस्कार केला व केव्हा केव्हा कॅथॉलिकांनीहि संघटना उभारून जेसुइटांवर प्रहार केले. या सर्व इहवादी हितकारक प्रेरणांमुळे त्यांचे इतिहास स्पेन, पोलंड इत्यादि देशांपेक्षा फार वेगळे झाले.
 धर्मसुधारणेच्या उदयाच्या काळी फ्रॅन्सिस पहिला (१५१५- १५४७) हा फ्रान्समध्ये राजपदीं होता. तो विद्या कलांचा भोक्ता होता. त्याने फ्रेंच भाषेला उत्तेजन दिले. त्यामुळे तेथे मोठे ग्रंथकार उदयास येऊन राष्ट्रभावनेचा परिपोष होऊं लागला. पण स्पेनबरोवर इटलींत चालू झालेल्या युद्धांत फ्रॅन्सिसचा पराभव झाल्यामुळे त्याला रोमच्या पीठावरील पोपच्या साह्याची जरूर वाटू लागली आणि मग पोपला खूष करण्यासाठी त्याने धर्मसुधारकांवर हत्यार धरलें. तरी मनांतून तो सुधारणेस अनुकूल असल्यामुळे प्रारंभी छळ बेताचाच होता. पण पुढील राजे हेन्री व दुसरा फ्रॅन्सिस यांनी ह्यूगेनॉट (फ्रेंच प्रोटेस्टंट) लोकांचा समूळ उच्छेद करण्याच्या प्रतिज्ञाच केल्या होत्या. पण ह्यूगेनॉटस् हे कमी नव्हते. ते संघटित होते आणि एका वेळीं पंचवीस-तीस हजार सैन्य ते रणांत उभे करूं शकत असत. त्यामुळे सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत फ्रान्समध्ये पांच धर्मयुद्धे झाली. फ्रेंच भूमि फ्रेंच रक्ताने भिजून गेली. आणि प्रबोधन- युगाचा अंतसमय आला. फिशर हा इतिहासकार म्हणतो, "या वेळीं फ्रेंच राज्यपदी कोणी शहाणा, समंजस, सहिष्णु राजा असता तर फ्रान्समध्ये उदित झालेल्या राष्ट्रभावनेचा फायदा घेऊन त्याने रोमन पीठाच्या वर्चस्वांतून स्वतःचें राष्ट्र मुक्त केलें असतें. त्यांत त्याला फ्रेंच कॅथालिक धर्मगुरूंचेंहि साह्य मिळाले असतें." इंग्लंडच्या आठव्या हेन्रीने हेंच केलें. त्यामुळे धर्मयुद्ध टळून इंग्लंड संघटित झालें. फ्रेंच राष्ट्र तसेंच संघटित झालें असतें. पण १५९८ पर्यंत एकामागून एक सर्व फ्रेंच राजे महामूर्ख, हेकट आणि धर्मांध निघाल्यामुळे फ्रान्सची अपरिमित हानि झाली. त्या वर्षी चौथा हेन्री गादीवर आला. तो शहाणा होता. त्याने 'एडिक्ट ऑफ् नॅंटीस' या जाहीरनाम्याअन्वये ह्यूगेनॉटस् ना धर्मस्वातंत्र्य देऊन, यादवीचा शेवट केला. हें स्वातंत्र्य १६८५ पर्यंत अबाधित होतें. तेरावा व चौदावा लुई हे अनियंत्रित राजे होते. पण त्यांनी त्या सालपर्यंत