पान:इहवादी शासन.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ११५
 

आणि स्पेन तर कडवा कॅथॉलिकधर्मी. लेकी याने म्हटलें आहे की, सोळाव्या शतकांत स्पेनला व्यापार व उद्योग यांत अधिराज्य सहज प्राप्त झालें असतें. पण असहिष्णुता, व्यापाराविषयीचीं धर्मबंधनें व उद्योगापेक्षा सोनें जास्त मानण्याची वृत्ति यांमुळे स्पेनने तें आपल्या हाताने घालविलें. मग तें मिळविलें कोणीं ? तर प्रोटेस्टंट पंथीय इंग्लिश व डच यांनी. कारण त्या पंथांत व्यापार, उद्योग यांवर असली बंधने नव्हती. (राइज ऑफ नॅशनॅलिझम इन् युरोप).

इटलीचा घात

 धर्मांधतेमुळे स्पेनने स्वतःचा तर घात करून घेतलाच, पण इटली या थोर राष्ट्राचाहि तसाच घात केला. फ्रान्स व स्पेन यांच्या इटलींतील साम्राज्यासाठी झालेल्या लढायांनी इटलीचा नाश झाला हें मागे सांगितलेंच आहे. १५३९ सालीं त्या संपून इटलीवर स्पेनची अधिसत्ता स्थापन झाली आणि मग जेसुइट, इन्क्विझिशन व नवमतप्रवर्तक ग्रंथ वाचण्यावरची बंदी या साधनत्रयीने इटलीच्या स्वतंत्र प्रज्ञेचा नाश केला. नेपल्स व व्हेनिस हीं दोन संस्थानें स्पेन व पोप यांपासून स्वतंत्र राहिली होती. त्यामुळे तेथेच प्रबोधनविद्येचें पुनरुज्जीवन होऊ शकलें. मिलन, फ्लॉरेन्स, पदुआ या संस्थानांनी वास्तविक इटलींत प्रबोधनाचें प्रवर्तन करण्याचा व युरोपला ज्ञानसंपन्न करण्याचा अग्रमान मिळविला होता. पण स्पेनचें साम्राज्य व जेसुइटांची धर्मसत्ता यांमुळे तेथील कर्तृत्वाला ग्रहण लागलें. (हिस्टरी ऑफ् युरोप, फिशर, पृष्ठ ५३९).
 सम्राट् फर्डिनांड पहिला याने १५५६ च्या सुमारास जेसुइटांना ऑस्ट्रियांत व साम्राज्यांत प्रवेश दिला. त्यानंतर पुढील साठ वर्षांत जेसुइटांनी व्हिएन्ना, वॉन, म्युनिच, कोलोन या नगरीत प्रवेश मिळवून तेथील विद्यापीठें ताब्यांत घेतली. पुढे स्टिरियाचा फर्डिनांड हा स्वतः जेसुइट असलेला राजा सम्राट् झाला व त्याने प्रोटेस्टंटांविरुद्ध हत्यार उपसलें. पेट्र्स कॅनिसियस हा कडवा कॅथॉलिक होता. ऑस्ट्रियांतील प्रतिक्रातीचें बव्हंशी श्रेय यालाच आहे. सम्राट् फर्डिनांड याचा हा परम मित्र. त्याने शिक्षणक्षेत्रांत जेसुइटांना सम्राटाकडून वर्चस्व मिळवून दिलें. जेसुइटांची सत्ता पुढे तीनशे वर्षे अबाधित राहिली होती. फर्डिनांडचे सर्व शिक्षण जेसुइट कॉलेजांतच झालें होतें. प्रोटेस्टंटांचा निःपात हें त्याचें एकमेव उद्दिष्ट होतें. आणि सत्ता हातीं येतांच त्याने आपल्या हत्याकांडाला प्रारंभ केला. प्रथम स्टिरिया, मग बोहेमिया व नंतर सर्व ऑस्ट्रिया असे प्रदेश क्रमाने घेऊन त्याने आपले उद्दिष्ट साध्य केलें. हें तीनहि प्रांत त्याने जेसुइट सत्तेखाली कायमचे आणून टाकले. फिशर म्हणतो, जगावर दुःखाचा एवढा डोंगर कोसळून आणणारा आणि मानवी प्रजेला इतक्या दीर्घकाळ बंधनांत टाकणारा राजा इतिहासांत विरळाच! (हिस्टरी ऑफ् युरोप, पृष्ठ ६१२).