पान:इहवादी शासन.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४ । इहवादी शासन
 

आरियस बार्बरोसा हा स्पेनमधला पहिला मानवतावादी पंडित. सालामांका विद्यापीठांत त्याने वीस वर्षे ग्रीक भाषेचें अध्यापन केलें. अँटोनियो लेविक्सा हा दुसरा पंडित (इ. स. १४७३) हा सोव्हिले, सालामांका व अलकाला या तीन विद्यापीठांत ग्रीक भाषा शिकवीत असे. समुद्रपर्यटनांत तर स्पेन, पोर्तुगाल अग्रेसर होते. पोर्तुगालचा राजा प्रिन्स हेन्री (१४१५- १४६१) हा नॅव्हिगेटर- जलप्रवासी- म्हणूनच प्रसिद्ध होता. भूगोल, खगोल, गणित या विद्या त्याने स्वतः अभ्यासिल्या होत्या. आफ्रिकेच्या किनाऱ्याने खाली जाऊन शेवटीं त्या खंडाला वळसा घालणारे वारथोलोमो, वास्कोदि गामा हे धाडसी लोक पोर्तुगालचेच होते. कोर्टिझ (१४८५- १५४७) पिझॅरो (१४७१– १५४१) या स्पॅनिश दर्यार्द्यांनी मेक्सिको व पेरू हे देश शोधले व जिंकलेहि होते.
 कोलंबस व पहिली पृथ्वीप्रदक्षिणा करणारा मॅगेलन यांना स्पेननेच सर्वतोपरी साह्य केलें होतें. मेक्सिको, पेरू येथून येणारे अपार सुवर्णधन स्पेनलाच मिळत होतें. असें असूनहि एका शतकाच्या आतच या देशाचें कर्तृत्व थंडावलें व पुढे पूर्ण मावळले. असें कां ? व्यक्तिस्वातंत्र्याचा, सहिष्णुतेचा, स्वतंत्र संशोधनाचा म्हणजेच इहवादाचा लोप हें त्याचें कारण आहे.
 १४७८ साली फर्डिनांड आणि इसाबेला या राजाराणींनी 'इन्क्विझिशन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रूर, अघोरी, न्यायशून्य अशा धार्मिक न्यायपीठांची स्थापना केली. प्रथम त्यांनी देशांतील मूर (मुस्लिम) व ज्यू या जमातींचा निःपात केला. आठ लक्ष ज्यू त्या वेळीं स्पेन सोडून परागंदा झाले. मूरहि तसेच हद्दपार झाले. या दोन्ही जमाती मोठ्या उद्योगी व सुधारलेल्या होत्या. त्यांना हाकलून धर्मांध न्यायपीठांनी स्पेनचें अतोनात नुकसान करून घेतले.
 पुढे १५१९ सालीं राजा पांचवा चार्लस पवित्र रोमन सम्राट् झाल्यावर त्याने धर्मसुधारकांचें निर्दालन करण्याचा विडाच उचलला. त्याच्या व त्याचा मुलगा दुसरा फिलिप याच्या राजवटींत इन्क्विझिशन न्यायपीठांनी जे घोर अत्याचार केले त्यांना सीमाच नाही. तिसरी विनाशक शक्ति म्हणजे जेसुइट पंथ ही होय. लायलॉने स्पेनमध्येच त्याची स्थापना केली होती व आरंभापासूनच त्याला राजाश्रय मिळाला होता. अशा रीतीने राजसत्ता व धर्मसत्ता- (दोन्ही अंधच) – एक होऊन त्यांनी स्पेनच्या प्रगतीला दोनशे वर्षे प्रतिरोध करून ठेवला. हॅन्स कोनने म्हटले आहे की, या सर्वांचा परिणाम होऊन स्पेनचें युरोपीयत्वच नष्ट झालें. (आयडिया ऑफ नशनॅलिझम, पृष्ठ १५४).
 मेक्सिको व पेरू या देशांतून स्पेनमध्ये अमाप सोनेरूपें येत होते. पण त्यामुळे स्पेनचा उत्कर्ष व्हावयाच्या ऐवजी अधःपातच झाला. तो पैसा उद्योगांत घालावा, त्याने कृषिविकास करावा ही स्पेनला बुद्धि झाली नाही. व्यापार, उद्योग यांविषयी ख्रिस्ती धर्माला तिरस्कार आहे. व्याजबट्टा, देवघेव यांना तो धर्म निंद्य, हीन मानतो