पान:इहवादी शासन.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ११३
 

कोणी उभे न ठाकल्यामुळे ती बीजें कुजून गेलीं. इहवादाचा त्या देशांत पूर्ण लोप झाला आणि त्यामुळे त्या देशांची प्रगति खुंटली. एवढेच नव्हे, तर ते पुन्हा तमोयुगांत जाऊन घोरत पडले. पश्चिम युरोपांतील वर निर्देशिलेल्या देशांच्या उत्कर्षापकर्षाची अशी ही अगदी साधी कारणमीमांसा आहे. इहवादाच्या अभ्यासाच्या दृष्टीने ती अत्यंत उद्बोधक असल्यामुळे तिच्याकडे जरा न्याहाळून पाहणें अवश्य आहे.

पोलंडची कहाणी

 प्रथम पोलंडची कहाणी ऐका. पंधराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पोलंड हें जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड यांच्याप्रमाणेच एक प्रगतिपथावरचें राष्ट्र होतें. चौदाव्या शतकांत कॉसिमीर राजाने (१३३०- १३७०) क्रॅको येथे विद्यापीठ स्थापन केलें होतें व तेथे रोमन कायदा, वैद्यक व तत्त्वज्ञान यांचा अभ्यास चालू झाला होता. या राजाच्या उदार व सहिष्णु धोरणामुळे इतरत्र ज्यांची कत्तल होत होती त्या ज्यू लोकांना पोलंडने आश्रय दिला होता. १४७४ साली क्रॅको येथे छापखाना आला आणि तेव्हापासून लॅटिनचें वर्चस्व कमी होऊन पोलिश भाषेचा उत्कर्ष होऊं लागला होता. पुढील पन्नास वर्षांत पोलंडमध्ये इतर कोठल्याहि देशांपेक्षा जास्त छापखाने प्रस्थापित झाले होते आणि विशेष म्हणजे अन्यत्र कोठेहि नसलेलें मुद्रणस्वातंत्र्य तेथे होतें. अर्वाचीन युगाचा आद्य प्रणेता अशी ज्याची कीर्ति आहे तो कोपर्निकस पोलंडमध्येच जन्माला आला होता. ॲडम झल झियान्स्की हा वनस्पति- शास्त्रज्ञ त्याच काळांतला. सोळाव्या शतकांत लूथर, काल्व्हिन यांच्या अनुयायांना पोलंडमध्ये मुक्तप्रवेश मिळत असे.
 पण दुर्दैवाने याच सुमारास पोलंडचे राजे दुबळे निघाले. वरील भिन्न पंथांना त्यांना कह्यांत ठेवतां आलें नाही. त्यांचे झगडे होऊं लागले आणि शेवटी १५६४ साली राजा दुसरा सिग्मंड याने जेसुइटांना आपल्या राज्यांत आश्रय दिला व त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व शिक्षणसंस्थाहि त्यांच्या स्वाधीन केल्या. त्या हातीं येतांच जेसुइटांनी शब्दप्रामाण्य, अंधश्रद्धा, असहिष्णुता यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या व जनतेच्या मनावर करून तेथे पुन्हा अंधारयुग आणले व पोलंडचा सर्वनाश केला. पोलंडमधील विद्या-कला आता संपल्या, संशोधन- बुद्धीचा अस्त झाला आणि पुढील शतकांत रशिया, प्रशिया व ऑस्ट्रिया यांनी हें राष्ट्रच भूपृष्ठावरून नाहीसें केलें. श्रिट या पोलिश इतिहासकाराच्या मतें, जेसुइटांच्या वर्चस्वामुळेच पोलंडचा असा नाश झाला. अनेक कारणांपैकी जेसुइट हें एक प्रधान कारण आहे, याविषयी कोणाचेंच दुमत नाही.

आणखी एक करुणकथा

 स्पेन आणि पोर्तुगाल या राष्ट्रांची करुणकथा अशीच आहे. इटली, जर्मनी यांच्याप्रमाणेच पंधराव्या शतकांत स्पेनमध्ये प्रबोधन- युगाला प्रारंभ झाला होता.
 इ. शा. ८