पान:इहवादी शासन.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२ । इहवादी शासन
 

संग्रह, निरीक्षण, वर्गीकरण या मार्गांनीच म्हणजे प्रायोगिक पद्धतीनेच सत्य शोधलें पाहिजे हें सांगून, त्याने वैज्ञानिक पद्धतीचा पाया घालून दिला. सोळाव्या वर्षीच ॲरिस्टॉटलच्या आधारें केवळ शाब्दिक पांडित्य करणाऱ्या केंब्रिजच्या प्राध्यापकांवर त्याने भडिमार करण्यास प्रारंभ केला होता. तो म्हणे की, "शब्दनिष्ठ अशी ही अध्यात्म धर्माची इमारत जमीनदोस्त केली पाहिजे. समाजाचा उत्कर्ष हे माझें ध्येय आहे. नव्या बौद्धिक संस्कृतीची स्थापना हें माझें कर्तव्य आहे." आणि ॲडव्हान्समेंट ऑफ् लर्निंग, नोव्हम् ऑरगॅनम्, नॅचरल हिस्टरी हे ग्रंथ लिहून त्याने तशी स्थापन केली याविषयी कोठेहि दुमत नाही.
 धर्मक्रांतीचे प्रवर्तक आणि तिचे विरोधक, धर्मसुधारक व जीर्णमतवादी यांच्यांतील सोळाव्या शतकांत सुरू झालेला हा संघर्ष पुढे तीनशे वर्षे चालू होता. जीर्ण पक्षाच्या बाजूने रोमचें धर्मपीठ, जेसुइट पंथ व बहुतेक सर्व कॅथॉलिक धर्माचार्य उभे होते. क्रांतिपक्षाच्या आघाडीला लूथर, काल्व्हिन, झ्विंगली, डेकार्ट, बेकन असे रथी-महारथी होते. अशा या महायुद्धांत ज्या देशांत क्रांतिपक्षाचा विजय झाला त्यांचा सर्वतोपरी उत्कर्ष झाला व ज्या देशांत जीर्णमताचा विजय झाला ते गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत अंधच राहिले. इहवादाशी या उत्कर्षाचा निकटचा संबंध असल्यामुळे त्याचा इतिहास जरा तपशीलाने पाहू.


 स्पेन, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, पोलंड, बोहेमिया हीं सर्व पश्चिम युरोपांतील राष्ट्रेंच आहेत. तरी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड, या पश्चिम युरोपांतील राष्ट्रांशी तुलना करतां ती फार मागासलेली आहेत. गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत तर त्यांची या प्रगत राष्ट्रांशी तुलनाच होऊ शकली नसती. असें कां व्हावें ? हा केवळ दैवयोग आहे काय ? वरवर पाहणारास याचें आश्चर्य वाटतें आणि तेराव्या- चौदाव्या शतकांत, ग्रीक विद्येचें पुनरुज्जीवन, रोमन धर्मपीठांविरुद्ध उठाव, भूगोल, खगोल, रसायनादि शास्त्रांचा उदय आणि प्रबोधन युगाची सर्व लक्षणें या देशांत दिसूं लागलीं होतीं, असें असूनहि तीं परागतच राहिली हें कळल्यावर तर आश्चर्य दुणावतें.
 पण वर सांगितलेल्या धार्मिक क्षेत्रांतील क्रांति- प्रतिक्रांतीच्या तत्त्वांचा त्या देशांतील इतिहास पाहिला की यांत आश्चर्य करण्याजोगें कांही नाही, समाजाच्या उत्कर्षापकर्षाचे जे इतिहाससिद्ध नियम त्याअन्वयेच हें सर्व घडलें आहे, हें ध्यानांत येतें. प्रबोधन-युगाच्या सर्व तत्त्वांचें बीजारोपण या सर्व देशांत झालें होतें. त्यामुळे तेथील मानवी प्रज्ञेचा विकासहि होऊं लागला होता. पण सोळाव्या शतकांत अंध धर्मसत्तेची त्या देशांत पुन्हा प्रस्थापना झाली आणि तिच्या प्रतिकारार्थं पूर्वीप्रमाणे तेथे