पान:इहवादी शासन.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १११
 

त्यामुळे प्रोटेस्टंट मताच्या विरुद्ध मतें मांडणारास देहदंड केलाच पाहिजे, असेंच त्यांचें मत होतें. मायकेल सर्व्हिटस् याने हार्वेच्या आधी पाऊणशे वर्षे (१५११-१५५३) रुधिराभिसरणाचा शोध लावला होता. पण काल्व्हिनच्या मतांच्या विरुद्ध त्याने प्रतिपादन केलें. त्यामुळे काल्व्हिनने त्याला जिवंत जाळून मारण्याची शिक्षा दिली. तेव्हा प्रोटेस्टंट हे प्रारंभीं तरी कॅथालिकांइतकेच असहिष्णु होते व लोकभ्रम, भोळया श्रद्धा, अज्ञान यांत फारसे मागे नव्हते. पण विवेक- स्वातंत्र्य, प्रस्थापित सत्तेला आव्हान देण्याची वृत्ति, प्रत्येकाला स्वतः बायबल वाचण्याचा अधिकार आहे हा सिद्धान्त, मध्यस्थाची जरूर नाही हें मत, यांमुळे विज्ञानाचा प्रकाश येतांच ते अंध धर्मसत्तेच्या शृंखलांतून लवकर मुक्त झाले. आणि कला, राजकारण, व्यापार यांना त्यांनी झपाट्याने इहवादी रूप दिलें.

लेकीचा सिद्धान्त

 तेव्हा सृष्टिघटनांविषयीचें लोकांचें अज्ञान हा अंध धर्मसत्तेचा पाया होय व विज्ञानाच्या प्रगतीमुळे तो पाया निखळून पडल्यामुळे, खरा कार्यकारणभाव मनुष्याला कळल्यामुळे तो सर्व जीवनाला इहवादी रूप देतो- त्याचें सेक्युलरायझेशन करतो- हा लेकीचा मुख्य सिद्धान्त आहे. निसर्गज्ञानाचा प्रसार होऊं लागला, नवे नवे शोध लागूं लागले, तसे डेकार्ट, मांटेन, वायले यांसारखे तत्त्ववेत्तेहि उदयास येऊ लागले व त्यांनी बुद्धिवादाचा हिरीरीने पुरस्कार केला. रेनी डेकार्ट (१५९६- १६५०) हा अशा तत्त्ववेत्त्यांचा अग्रणी होय. अर्वाचीन तत्त्वज्ञानाचा त्याला जनकच मानतात. त्याने तत्त्वज्ञानाला गणिती पद्धति लावली. त्यामुळे त्याच्या तत्त्वज्ञानाचा पहिला सिद्धान्त अस की, कोणतीहि गोष्ट सिद्ध म्हणून प्रारंभी स्वीकारावयाची नाही. पदार्थविज्ञान असो, अध्यात्मशास्त्र असो, त्याच्या अभ्यासाला आपण अलिप्त मनाने- श्रद्धा किंवा अश्रद्धा कांहीच न बाळगतां- सुरुवात केली पाहिजे. कोणताहि सिद्धान्त पुढे येवो, त्याचा आपण शंका घेऊन, आक्षेप घेऊनच विचार केला पाहिजे, असें त्याचें प्रतिपादन असे. त्यामुळे डेकार्टने युरोपला शंका घ्यायला शिकविलें, असें म्हटलें जातें.
 कॅथॉलिक धर्मावर, रोमन पीठावर हा फार मोठा आघात होता. त्याचप्रमाणे पांढरी दिसणारी वस्तु काळी आहे असें चर्चने सांगितलें तर तें मानले पाहिजे, या जेसुइटांच्या मतावर हा चांगला उतारा होता. पियरी वायले (१६४७-१७०६) हाहि डेकार्टसारखाच बुद्धिवादी तत्त्ववेत्ता होता. याला इतिहासवेत्त व्हाल्टेअरचा गुरु मानतात. चिकित्सा, विश्लेषण केल्यावांचून कोणताहि सिद्धान्त- धर्मसिद्धान्त सुद्धा- स्वीकारावयाचा नाही, हें त्याचें आद्य तत्त्व होतें
 या सर्व तत्त्ववेत्त्यांचा मुकुटमणी म्हणजे इंग्लिश शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेकन हा होय. (१५६१–१६२६) नव्या मानवी कर्तृत्वाचा हा सर्वश्रेष्ठ प्रणेता होय. घटितांचा