पान:इहवादी शासन.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११० । इहवादी शासन
 

 हें विवेचन म्हणजे इहवादाचा उदय, विकास आणि प्रगति-परागति यांचेंच विवेचन होय. 'दि राईज ॲण्ड इन्फ्लुअन्स ऑफ् नॅशनॅलिझम इन् युरोप', या आपल्या विख्यात ग्रंथांत (युरोपांतील बुद्धिवादाचा- कार्यकारणभावाचा उदय व प्रभाव) प्रसिद्ध आयरिश ग्रंथकार लेकी याने हा सर्व इतिहास दिला आहे. त्याचा अवश्य तो सारार्थ पुढे देतों. दैवी, अतिमानुष चमत्कारावरील मानवाची श्रद्धा कमी होऊं लागली की, इहवादाचा उदय होतो. आणि ही श्रद्धा निसर्गनियमांच्या अभ्यासामुळे, पदार्थ- विज्ञान, रसायन, भूगोल, खगोल या शास्त्रांच्या ज्ञानामुळे कमी होत जाते. भूकंप, महापूर, धूमकेतु, चंद्र-सूर्यांना पडणारी खळीं, विद्युत्पात, साथीचे रोग यांची कारणें विज्ञानपूर्व युगांत माहीत नसतात. या सर्व आपत्ति परमेश्वरी रोषांमुळे ओढवतात अशी त्या काळी मानवाची भोळी श्रद्धा असते. ख्रिस्ती धर्मात, मानवाचें पतन मूळ- मानव जो ॲडम त्याच्या पापामुळे झालें व निसर्गत: मानव पापप्रवृत्तीचा आहे, अशी श्रद्धा असल्यामुळे धर्मनिरूपणांत या दैवी आपत्तीचा फारच बाऊ केला जात असे.

ख्रिस्ती धर्मपंडितांचा सिद्धान्त

 ख्रिस्ती धर्माशिवाय अन्य धर्म मोक्ष देण्यास असमर्थ आहेत, असा ख्रिस्ती धर्मपंडितांचा सिद्धान्त आहे. तेव्हा ख्रिस्ती धर्मांतील आज्ञांप्रमाणे आचरण करण्यावांचून गत्यंतर नाही, हें उघडच झालें आणि त्या धर्माचीं मतेंहि- इहपरलोकीच्या प्रत्येक घटनेविषयी मतेंहि- मान्य करणें हाहि धर्माचरणाचाच भाग समजला जात असे. भुतेंखतें, सैतान, चेटुक यांचें अस्तित्व त्या धर्माने मान्य केलें होतें. त्यामुळे देवाप्रमाणेच भुता- खेतांवर, चेटकांवर म्हणजे त्यांच्या अस्तित्वावर मानवाने श्रद्धा ठेवलीच पाहिजे, असा त्याचा दण्डक होता. त्यामुळे मनुष्य चेटक्या आहे किंवा बाई चेटकीण आहे अशी शंका आली, तर त्याला वा तिला जशी देहान्त शिक्षा असे, तशीच चेटुक, भूत, सैतान, यांवर श्रद्धा न ठेवणाऱ्यांनाहि, धर्मपीठे जबर शिक्षा करीत. हॉलंड हें राष्ट्र प्रोटेस्टंट धर्माच्या अवलंबामुळे पुष्कळच प्रगत झालें होतें. तरी १६९१ साली बाल्थसर बेकर या धर्मगुरूला, त्याने भुतेखतें सर्व झूट आहे असें लिहिल्यामुळे, धर्मपीठाने शिक्षा केली होती.
 धर्मग्रंथांतील सिद्धान्तांत सृष्टिघटनांविषयीचे सिद्धान्त येतच असत. आपण ज्या गोलार्धांत राहतों त्याच्या दुसऱ्या बाजूच्या गोलार्धात पशुपक्षी, माणसें आहेत असें मानणें हें ख्रिस्ती धर्माला पाप वाटे. पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर आहे, त्याच्यावर डाग आहेत असें मानणें हें पापच होय आणि ते मानणारा मनुष्य मोक्षाला जाणें शक्य नाही. अशा माणसाला जाळून टाकून त्याचा आत्मा त्या पापी कुडींतून सोडविणें हें धर्माचार्यांना आपले कर्तव्य वाटे. अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की, या बाबतींत प्रोटेस्टंट पंथहि जुन्या पंथाइतकाच अंध होता. विवेक- स्वातंत्र्याचें तत्त्व त्याने मांडलें हें खरें; पण लूथर, काल्व्हिन यांचा चेटकांवर जुन्या धर्माइतकाच विश्वास होता.