पान:इहवादी शासन.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १०९
 

विवाहबंदी, शुद्धिबंदी, वेदवंदी (शूद्रांना वेदपठनास बंदी), समुद्रबंदी, रोटिबंदी या सर्व दुष्ट घातक रूढींचे हे नवे पंडित गाल्टन्, हक्सले, कार साँडर्स, काल पियरसन्, आइन्स्टाईन इत्यादि पाश्चात्त्य शास्त्रज्ञांच्या आधारें समर्थन करूं लागले. गो. म. जोशी, आहिताग्नि राजवाडे, अप्रबुद्ध, बाळशास्त्री हरदास हीं या पंथांतलीं नांवें प्रसिद्ध आहेत. जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य, जातिभेद, वेदांचें अपौरुषेयत्व यांचें आजहि अशा पद्धतीने समर्थन केलें जातें, हें आपण पाहतच आहों. इग्नेशियस् लॉयलॉ यांच्या जेसुइट पंथाने हाच उद्योग, सोळाव्या शतकांत सुरू केला. जेसुइट वाटेल त्या देहदंडनाला तयार असत. थंडी, वारा, ऊन ते मोजीत नसत. दारिद्र्यांत खुषीने राहत. हें त्यांचे देहदंडन व ती नवविद्या या बळावर त्यांनी केवळ युरोपच नव्हे, तर सर्व जग आक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा मनांत धरली. आणि ती आकांक्षा सफल करण्यांत त्यांना विपुल यश लाभलें, हें मान्य केलें पाहिजे.

प्रभावी संस्कार

 प्रबोधन-युगांतील नवविद्या व त्यांतून निर्माण झालेली बुद्धिवाद, व्यक्तिवाद, स्वतंत्र चिंतन, प्रवृत्तिपरता, परिवर्तन वृत्ति, सहिष्णुता ही तत्त्वें यांमुळेच जीर्ण, अंध सनातन धर्माचा पाया हादरला होता. हें जाणून जेसुइटांनी एक धोरण निश्चित केलें. तें असें की, ज्या देशांत त्यांना प्रवेश मिळेल व जेथले सत्ताधारी त्यांना वश होतील त्या देशांतील शिक्षणसंस्था- शाळा, महाशाळा, विद्यापीठें- प्रथम ताब्यात घ्यावयाच्या व नवविद्येच्या साह्यानेच वरील धर्मसुधारणेचीं तत्त्वें कशी निंद्य आहेत व कॅथॉलिक धर्माचीं शब्दप्रामाण्यादि तत्त्वें कशी बरोबर व हितकारक आहेत तें बालतरुण विद्यार्थ्यांच्या बुद्धीवर ठसवावयाचें.
 बालवयांत केलेले हे संस्कार फार प्रभावी ठरत आणि विद्यार्थी कायमचे अंध कॅथालिक होत व प्रोटेस्टंट पंथाशी युद्ध करण्यास उभे ठाकत. सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध व सतरावें संपूर्ण शतक या कालखंडाचा पश्चिम युरोपचा इतिहास म्हणजे या धार्मिक यादवीचा, रक्तपाताचा, क्रूर अत्याचारांचा, नाश, विध्वंस, प्रलय यांचा इतिहास आहे. इंग्लंड, हॉलंड, स्वित्झर्लंड या देशांतील लोकांनी विवेकाचा अवलंब करून या आपत्ति टाळल्या. फ्रान्स, जर्मनी यांना त्यांच्याइतकें यश आले नाही. पण बऱ्याच रक्तपातानंतर त्यांना थोडा थोडा विवेक मधून मधून सुचत असे. पण स्पेन, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, पोलंड, बोहेमिया हे पश्चिम युरोपांतले देश धार्मिक प्रतिक्रांतीला बळी पडून तीनशे वर्षे पुन्हा तमोयुगांत पिचत राहिले. (हिस्टोरियन्स हि. खंड ९ वा, स्पेन, पृष्ठे २३०, ३१) या देशांच्या यशापयशाचा इतिहास इहवादाच्या दृष्टीने फारच उद्बोधक आहे. पण तो पाहण्याआधी या धार्मिक क्रांति- प्रतिक्रांतीचें विवेचन प्रथम पुरें करूं.