पान:इहवादी शासन.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८ । इहवादी शासन
 


लॉयलॉची प्रतिक्रांति

 ही धर्मक्रांतीची लाट अशीच सर्व युरोपभर पसरली असती, तर अंध धर्मसत्तेच्या मगरमिठींतून सोळाव्या शतकाअखेरच तो मुक्त झाला असता. पण तसें झाले नाही. याच वेळी प्रतिक्रांतीचीहि तयारी होत होती. आणि लूथरप्रमाणेच तिला एक जबरदस्त नेता लाभला होता. त्याचें नांव इग्नेशस लायलॉ. लायलॉ हा एक निवृत्त स्पॅनिश लष्करी अधिकारी. लूथरच्या प्रोटेस्टंट पंथाचें ख्रिस्ती धर्मावर होत असलेले आक्रमण त्याला पाहवेना. म्हणून त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याच्या निर्धाराने त्याने १५३४ साली जेसुइट पंथांची स्थापना केली. १५४० साली त्याला पोपने मान्यता दिली आणि मग पंथाचे कार्य अत्यंत वेगाने सुरू झालें.
 लायलॉच्या अंगीं ध्येयवाद, वक्तृत्व, संघटनाचातुर्य, धर्मनिष्ठा, वेधशक्ति अशा अनेक गुणांचा परिपाक झाला होता. त्याला भराभर अनुयायी मिळाले, लष्करी शिस्त हा या पंथाचा विशेष होता. लष्करांत सेनापतीच्या आज्ञा जशा विनतक्रार पाळतात तशाच जेसुइट पंथांत पाळल्या जातात. पूर्ण, अंध शब्दप्रामाण्य हा पंथाचा दुसरा विशेष होय. "हा कागद पांढरा आहे. पण तो काळा आहे असें चर्चने सांगितलें, तर तें तत्काळ मान्य केलें पाहिजे." हा त्याचा कायदा होता. याशिवाय लायलॉने जेसुइट पंथीयांना आणखी दोन गुणांची जोपासना करण्यास सांगितले. ज्ञानोपासना व खडतर तपश्चर्या हे ते दोन गुण होत. लायलॉ मोठा धोरणी व समयज्ञ पुरुष होता. रोमचें पीठ, पोप व बहुतेक सर्व धर्माचार्य हे अत्यंत भ्रष्ट होते. ब्रह्मचर्य हे व्रत त्यांना घ्यावेच लागे. तसें तें घेत पण बहुतेक सर्वांना मुलेबाळे असत. या व्यभिचारजन्य संततीला पुतणे, भाचे, असें म्हणत. पण काही पोप इतके उन्मत्त झाले की, ते जाहीरपणें हीं आमचीच मुले आहेत असे सांगत.
 असल्या चारित्र्यहीन माणसांकडून प्रोटेस्टंट पंथाला थोपविण्याचे कार्य होणें अशक्य आहे, हें इग्नेशस् लॉयलॉने जाणलें होतें. त्याचप्रमाणे नवें भू-विज्ञान, खगोल- ज्ञान, रसायन, गणित या विद्यांमध्ये जे पारंगत नाहीत त्यांना धार्मिक क्रांतीच्या प्रोटेस्टंट तत्त्वांचें खंडन करणें व समाजमनावर सनातन ख्रिस्ती धर्माचीं रूढ तत्त्वं पुन्हा ठसविणें हें साधणार नाही, हेंहि त्याला कळलें होतें. म्हणून प्रत्येक जेसुइट विद्वान असलाच पाहिजे, प्रबोधनयुगांतील विद्यांच्या आधारेंच त्याने रोमन धर्मपीठाचें समर्थन करण्याची कला साधली पाहिजे, असा त्याने दंडक घालून दिला.
 आपल्याकडे जुन्या भटजींना रूढ सनातन धर्माचें समर्थन करण्याची पात्रता मुळीच नव्हती. म्हणून तें कार्य करण्यासाठी नवविद्याविभूषित लोक पुढे आले. कोणत्याहि सुधारणेला विरोध करावयाचा आणि रूढीचें समर्थन करावयाचें हेंच त्यांचें व्रत. त्याअन्वये अस्पृश्यता, जातिभेद, चातुर्वर्ण्य, बालविवाह, विधवा-