पान:इहवादी शासन.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १०७
 

करण्यासाठी त्यांना अक्षरश: पिळून काढीत असत. जर्मन सरंजामदार हे तर त्यांचे पिढ्यान् पिढ्यांचे वैरी होते. आणि त्या शेतकऱ्यांना माहीत होतें की, रोमन चर्चचा त्या सरंजामदारांना पाठिंबा होता. अशा स्थितीत "प्रत्येकाला बायबल स्वतः वाचण्याचा अधिकार आहे, मोक्षासाठी धर्मगुरु या मध्यस्थाची गरज नाही, पोपला लोकांवर कर बसविण्याचा अधिकार नाही, मोक्षासाठी मुक्तिपत्रकें विकत घेण्याची गरज नाही." या लूथरच्या घोषणा किसानांना अत्यंत प्रिय वाटल्या व तेहि पोपविरुद्ध उसळून उठले. हे सर्व जाणूनच लूथरने पोपचें तें बहिष्कारपत्र जाहीरपणें चव्हाट्यावर जाळून टाकलें.
 सर्व ख्रिस्ती विश्वांत लूथरच्या या कृत्यामुळे हाहाकार उडाला. धर्माचार्यांना तर हा भूकंपच वाटला. विश्वाचा अंतकाळ जवळ आला, असें पोप-भक्तांना वाटलें. याची दखल घेतली नाही तर आपलें साम्राज्य कोसळेल अशी भीति सम्राट् चार्लस याला वाटली आणि वर्म्स या गावीं धर्मसभा घेऊन त्याने लूथरला त्या सभेपुढे जाब देण्यासाठी उभे राहण्याचा हुकूम दिला. सभेपुढे उभे राहून सम्राटाकडे रोखून पाहत लूथरने निर्भयपणें जवाब दिला की, "माझे सिद्धान्त, माझीं मतें खोटी आहेत, चुकीचीं आहेत असें बायबलच्या आधारें सभेने सिद्ध करून द्यावें. तें होत नाही तोपर्यंत माझ्या पत्रकांतील एक शब्दहि मी परत घेणार नाही. कारण तसें करणें म्हणजे विवेकाच्या विरुद्ध वागणें होय. तें पाप आहे." सम्राट् अत्यंत संतापला. पण सभेला येण्याचा हुकूम देतांना त्याने लूथरला अभय दिलें होतें म्हणून त्याने त्याला जाऊं दिलें.
 अर्थात् सर्व जनसागर त्याच्या पक्षाचा होता हेंच खरें कारण होतें. लूथर सभेंतून बाहेर पडतांच सॅक्सनीचा राजा याने आपलें लष्कर त्याच्या संरक्षणार्थं उभे केलें व वार्टबर्ग येथील किल्ल्यांत त्याला नेऊन कडेकोट बंदोबस्तांत सुरक्षित ठेवलें. एक वर्षाने लूथर त्या किल्ल्यांतून बाहेर पडला तेव्हा त्याने प्रसृत केलेल्या तत्त्वज्ञानाच्या ज्वाळा सर्व उत्तर युरोपांत पसरल्या होत्या. जीन कालव्हिन् हा लूथरचा समकालीन. तो त्याच्याइतकाच मोठा धर्मसुधारक होता. झ्विंगली हें नांव जवळ जवळ तितकेंच प्रसिद्ध आहे. इंग्लंडमध्ये क्रॅनमर व लॅटिमर यांनी धर्मसुधारणेसाठी आत्मबलिदान केलें. या सोळाव्या व पुढल्या सतराव्या शतकांत लहानमोठ्या हजारौ, अक्षरश: हजारो, सुधारकांनी या धर्मपरिवर्तनासाठी तुरुंगवास, हद्दपारी, अघोरी छळ, आणि प्राणदंड अशा यातना भोगल्या, पण आपलीं तत्त्वें सोडली नाहीत. इंग्लंडमध्ये लॅटिमर बरोबरच रिडले याला अग्निस्तंभाशी बांधण्यांत आलें होतें. मृत्युपूर्वी लॅटिमर रिडलेला म्हणाला मित्रा, धीर सोडूं नको. आपण परमेश्वरीकृपेने आज इंग्लंडमध्ये अशी ज्योत पाजाळूं की, जी कधीहि विझणार नाही."