पान:इहवादी शासन.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६ । इहवादी शासन
 

मन भोवतालचा विकृत धर्म पाहून अस्वस्थ होत असे. त्यांतच १५१० सालीं तो रोमला गेला. तेथल्या धर्मपीठाचें अमंगळ रूप पाहून त्याला किळस आली. परत आल्यावर त्याने जाहीरपणे सांगितले की, "रोम ही एक बाजारबसवी आहे. जो जास्त पैसे देईल त्याला ती वश होते. या धर्मपीठाचा व ख्रिस्ती धर्माचा मुळीच संबंध नाही." याच वेळीं त्या पीठाचे मुनीम देशोदेशीं, गावोगावी जाऊन मुक्तिपत्रके विकून अमाप पैसा गोळा करीत होते. ही भ्रष्टता पाहून लूथरचा संताप अनावर झाला व त्याने आपल्या भाषणांतून या मुक्तिपत्रकांवर भडिमार सुरू केला. "पश्चात्तापावांचून शुद्धि नाही व श्रद्धेवांचून मुक्ति नाही. मानवाला दक्षिणा घेऊन मुक्ति देण्याचें सामर्थ्यं जगांत एकाहि धर्मपीठाला नाही," असें जाहीर करून त्याने आपलें धर्मसुधारणेचें ९५ कलमी पत्रक विटेंबर्गच्या चर्चच्या दारावर चिकटवून दिलें.
 त्या वेळीं स्पेनचा राजा पांचवा चार्लस् हा पवित्र रोमन सम्राट् होता. तो पक्का जीर्णमतवादी असून धर्मसुधारकांचा हाडवैरी होता. जर्मनींतल्या धर्माचार्यांची त्याच्याकडे लूथरविरुद्ध अर्ज केला. मुक्तिपत्रांना विरोध केल्यामुळे रोमच्या पोपच्या अंगाची आग झाली होती. त्याच्याकडेहि अर्ज गेलेच होते. त्याने आपले भयंकर अस्त्र लूथरवर फेकलें. त्याने लूथरवर बहिष्कार पुकारला. पण त्या बहिष्कारांत पूर्वी जें सामर्थ्य होतें तें आता राहिलें नव्हतें. प्रबोधनयुगाने लोकांच्या पोप श्रद्धेला हादरा दिला होता. लूथरला हें चांगलें माहीत होतें. कारण मुक्तिपत्रकांविरुद्ध व एकंदर रोमपीठाविरुद्ध तो जीं भाषणें करी त्यांना हजारो लोक येत. तो जी पत्रके काढी त्यांच्या प्रती हातोहात खपत. राजे, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी- सर्व सर्व तीं पत्रकें वाचीत. त्यांवर सम्राटाने व पोपने बंदी घातली होती, तरी त्यांचा प्रसार थांबला नाही.
 लोकांच्या मनांत तरी एवढी प्रतिकारशक्ति कोठून जागृत झाली ? प्रबोधन- युगाने क्रांति केली होती हें खरें. पण सामान्य जनांपर्यंत तिच्या लाटा अजून पोचल्या नव्हत्या. त्यांना तत्त्वनिष्ठेने, बुद्धिप्रामाण्याने येणारे मनःसामर्थ्य येण्यास अजून फार अवकाश होता. रॉजर बेकन्, कोपर्निकस यांची नांवेंहि त्यांनी ऐकली नव्हतीं. पण तत्त्वनिष्ठा त्यांना समजत नसली, तरी आता राष्ट्रनिष्ठा त्यांना समजूं लागली होती. लूथर हा जर्मन होता आणि त्याला निर्दाळू पहाणारा रोमन सम्राट् चार्लस् हा स्पॅनिश होता. आणि पोप तर कायमचा परकी होता. यामुळे जर्मन राष्ट्र लूथरच्या मागे उभे राहिलें.

मुक्तिपत्रांची जाहीर होळी

 जर्मन शेतकरीवर्ग हा राष्ट्रीय भावनेने भारला होताच. पण आणखी एका कारणाने त्या शेतकऱ्यांना चेतविलें होतें. पोपचे धर्मप्रचारक नाना तऱ्हेचे कर वसूल