पान:इहवादी शासन.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४ । इहवादी शासन
 

ऐक्य साधून स्वसंरक्षण करण्यास समर्थ झाली. पण राष्ट्रभावनेवांचून हें ऐक्य फार काळ टिकणें शक्य नव्हतें. याच वेळी नेपल्ससंबंधी फ्रान्स व स्पेन यांच्यांत वाद निर्माण झाला व त्या दोन्ही देशांनी आपल्या सेना इटलींत घुसविल्या. त्यांच्यांतील या लढाया साठ वर्षे चालू होत्या. शेवटीं स्पेनचा विजय झाला. स्पेनचे राजे कडवे, अंध, कॅथॉलिक होते. त्यांची सत्ता इटलीवर प्रस्थापित झाली आणि या देशांतले प्रबोधन संपून तेथे अंधकारयुग सुरू झाले. (दि हिस्टोरियन्स हिस्टरी ऑफ् दि वर्ल्ड, खंड ९ वा पृष्ठ ४६२).
 जर्मनींतहि इटलीप्रमाणेच कायम यादवी होती. तेथला रोमन सम्राट् सत्तालोभाने नेहमी पोपच्या अंकित असे. १५१९ च्या सुमारास स्पेनचा राजा पांचवा चार्लस् हा पवित्र रोमन सम्राट् झाला. तो एकांतिक कॅथॉलिक असून पोपच्या सत्तेचा कट्टा पुरस्कर्ता होता. अशी युति झाल्यामुळे रोमच्या धर्मपीठाची सत्ता पुन्हा प्रबळ झाली. त्यामुळेच जर्मन प्रबोधनाचा अंत झाला. पण या वेळी मार्टिन लूथरचा उदय होऊन युरोपच्या इतिहासाला निराळंच वळण लागले.


 पश्चिम युरोपांतील इहवादाचा विकास कसकसा होत गेला तें आपण पाहत आहों. पांचव्या शतकापासून बाराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या प्रदेशावर रोमच्या धर्मपीठाची अंध, दुराग्रही, अनियंत्रित अशी सत्ता होती. तिला पहिले आव्हान राष्ट्रभावनेने दिले आणि प्रबोधनाने तिचा पायाच निखळून टाकला. असे असले तरी इहवादाचा पुढला प्रवास सरळ, बिनधोक, संथ गतीने व निष्कंटक मार्गाने झाला असें मान नाही. धर्मभावना ही अगदी अमर अशी भावना आहे. परमेश्वरावरील श्रद्धेवांचून मानव जगूच शकणार नाही. परलोकाची चिंता पूर्णपणे नष्ट कधीच होणार नाही. ही धर्मभावना नष्ट व्हावी असेंहि इहवादी पंडित म्हणत नाहीत. लोकांच्या या श्रद्धेचा फायदा घेऊन धर्मपीठे, धर्माचार्य धर्माला अत्यंत विकृत रूप देतात व समाजाच्या प्रज्ञेचा, बुद्धीचा आणि कर्तृत्वाचा घात करतात. यावर म्हणजे या धर्मविकृतीवर, या हीन, अमंगळ भ्रष्ट धर्मावर व त्याच्या आधारें सत्ता व धनैश्वर्य मिळवून स्वैर भोगविलास करणाऱ्या धर्माचार्यांवर इहवादाचा आक्षेप असतो. जगांत सर्वच देशांत असे धर्माचार्य व धर्मपीठे असतात. पण रोमचें धर्मपीठ व त्या पीठाचे आचार्य जे पोप यांनी या काळांत जी अधःपाताची हीन पातळी गाठली होती तिला सीमाच राहिली नव्हती. रोमचें पीठ म्हणजे सैतानाचेंच पीठ होऊन बसलें होतें. आणि अशाहि स्थितीत त्याला पश्चिम युरोपांतील सत्ताधीशांचें विपुल साह्य मिळत असे. यामुळे आपलें सर्व सामर्थ्य खर्च करून इहवादी प्रेरणांचा निःपात करण्याचा तें पीठ पुनः पुन्हा प्रयत्न करीत असे.