पान:इहवादी शासन.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १०३
 

सारखे लॅटिन पंडित आहेत. मॅकिॲव्हिलीचें राजनीतिशास्त्रज्ञ म्हणून आजहि जगांत नांव गाजत आहे. अलवर्टी हा व्हिन्सीसारखाच चतुरस्त्र होता. काव्य, चित्र, शिल्प, नाट्य या कलांबरोबरच यंत्रविद्या, चाक्षुषविद्या या विद्याहि त्याला वश होत्या. याशिवाय इटलींतील इतिहासकार शास्त्रज्ञ, कलाकार, साहित्यिक यांची लांबच लांब यादी देतात. पण ग्रीक विद्येचा म्हणजेच इहवादाचा प्रभाव काय आहे हें एवढ्यावरून सहज ध्यानी येण्यासारखें आहे.

मुद्रणकलेचा शोध

 जर्मनीत प्रबोधन-युग इटलीनंतर शंभर वर्षांनी आलें. १४५० ते १५०० या अर्धशतकांत तेथे विद्याकलांचा इटलीसारखाच विलास दिसत होता. फिशर हा इतिहासकार म्हणतो, त्या काळांत जर्मनीत जीं आठ ज्ञानपीठे स्थापन झालीं तींच जर्मन विद्वत्ता, पांडित्य, शास्त्राभ्यास यांचा पाया आहे. जर्मनीची या काळांतली सर्वांत मोठी देणगी म्हणजे गटेंबर्ग याने शोधिलेली मुद्रणकला ही होय. प्रबोधन- युगांतल्या विद्या, कला, साहित्य यांना चिररूप देऊन समाजांत त्यांचा प्रसार करण्याचें श्रेय या मुद्रणकलेला असल्यामुळे त्या वेळी झालेल्या क्रांतीचें श्रेय गटेंबर्गला व जर्मन मुद्रकांना देण्यांत येतें.
 छापखाना ही मोठी शक्ति आहे. क्रांतिकार्यांत तिचें स्थान निस्तुळ आहे, हें जाणून, जर्मन मुद्रक मिशनऱ्यांच्या कर्तव्यबुद्धीने व उत्साहाने सर्व युरोपभर आपली कला घेऊन जात असत. पंधराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत त्यांनी इटलींत शंभर व स्पेनमध्ये तीस छापखाने काढले व जवळजवळ ९० लक्ष पुस्तकें छापली. म्हणून मुद्रणकलेला त्या काळी जर्मनकला असेंच म्हणत. उदारमतवादाच्या प्रसाराला सोळाव्या शतकांत तिने मोठेच साह्य केलें. या कलेप्रमाणेच जर्मनींत स्थापत्य, शिल्प, संगीत, चित्र या कलांतहि पुष्कळ प्रगति झाली होती. 'नुरेंबर्ग' या जर्मन नगरीला जर्मनीतील 'फ्लॉरेन्स' असें त्या काळी म्हणत. निकोलस क्रेब्ज (कार्डिनल कुसानस) (१४०१-६४) हा जर्मन प्रबोधनाचें प्रतीक म्हणून समजला जातो. तो अत्यंत धर्मनिष्ठ असून मानवतावादी होता. गणित, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र या शास्त्रांत कोपरनिकस, हेगेल व डेकार्टस् यांचा तो पूर्वागामी होता, असें म्हणतात.

सामर्थ्यांचा अभाव

 आता प्रश्न असा येतो की, अशी अभूतपूर्व जागृति होऊन इटली व जर्मनी येथे सुरू झालेलें प्रबोधन युग त्याचा सोळाव्या शतकाच्या मध्याला अस्त कशाने झाला ? बुद्धिप्रामाण्य, मुक्तप्रज्ञा, सहिष्णुता, मानवता यांसारखीं जीं थोर तत्त्वें- त्यांचा पुरस्कार करणाऱ्या लोकांच्या ठायीं राष्ट्राचें संरक्षण करण्याइतकें सामर्थ्य असावें लागतें. तें या दोन्ही देशांत नव्हतें ! दोन शतकें इटलींतील नगरराज्ये कांहीसें