पान:इहवादी शासन.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२ । इहवादी शासन
 

त्यांचे सिद्धान्त खरे असूं शकतील हें मान्य करून, त्या धर्मांचाहि आपल्याइतकाच मान ठेवणें याचें नांव सहिष्णुता. सर्वधर्मसमानत्व तें हेंच. भौतिक विद्या, ज्ञान या विषयीहि इरॅसमसची हीच दृष्टि होती. विद्या ही विद्येसाठी नाही. मन, बुद्धि स्वतंत्र व्हावी, त्यांवर उदार संस्कार घडावेत, ह्यासाठी विद्या हवी; आणि ही विद्या म्हणजे त्याच्या मतें ग्रीक विद्या होय. हे चौघेहि मानवतावादी पुरुष ग्रीकविद्येचे पुरस्कर्ते होते. त्या ग्रंथांची भाषांतरें करणें, त्यांचे अध्ययन-अध्यापन करणें, विद्यापीठांतून त्यांचा अभ्यास व्हावा अशी व्यवस्था करणें यासाठी ते आटोकाट प्रयत्न करीत. कारण या विद्यमुळे मन्वन्तर घडावयाचें आहे हें त्यांनी जाणलें होतें.
 कॉलेट हा इंग्लंडमधला ग्रीक विद्येचा अत्यंत मोठा पंडित. त्या विद्येच्या आधारेच धर्मग्रंथांची ऐतिहासिक चिकित्सा करण्यास तो शिकला. शब्दांचें जंजाळ बाजूला करून ग्रंथकर्त्याच्या भावार्थाकडे पाहावें, असें तो सांगत असे. 'सेंट पॉल स्कूल' या शाळेचा तो संस्थापक व प्राचार्य होता. या शाळेवर धर्माचें नियंत्रण येऊ द्यावयाचें नाही, असा त्याचा कटाक्ष होता. तीर्थयात्रा, यांत्रिक धर्मविधि यांवर त्याचा विश्वास नव्हता. परमेश्वर हा कर्मकांडाच्या चौकटींत बसणें शक्य नाही, असें तो म्हणे. सर थॉमस मूर याने 'युटोपिया' (मनोराज्य) या आपल्या ग्रंथांत (इ. स. १५१६) असेच विचार मांडले आहेत. त्या आदर्श राज्यांत शिक्षण सर्वांना- पुरुषां प्रमाणेच स्त्रियांनाहि- उपलब्ध होतें. तेथले कायदे सौम्य होते. (इरॅसमस, मूर, कॉलेट हे सर्वच स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते होते). सर्वत्र सहिष्णुता होती. थोडक्यांत म्हणजे, तें आजच्या काळचे कल्याणकारी राज्य होतें. वायक्लिफप्रमाणेच मूरनेहि आपल्या ग्रंथांत साम्यवादी विचार मांडले आहेत. प्रत्येकाने मर्यादित तास काम करावें व राहिलेला वेळ विद्या, कला, क्रीडा यांत घालवून मनोरंजन करावें अशी ही विचारसरणी आहे. निवृत्तिवादाचा आश्रय करून सर्व समाजाने जीवनाला सुतकी कळा आणावी, हें प्रबोधन- युगाला मान्य नव्हतें. हे सर्व पंडित आनंदवादी, आशावादी व प्रवृत्तिवादी होते. इहवादाप्रमाणेच मानवतावादाचीहि अशी आनंदवादी, उल्हासवादी दृष्टि होती.
 ग्रीक विद्या प्रथम इटलीमध्ये आली आणि ग्रीसमध्ये तिने जें फळ ग्रीकांना दिलें तेंच आता ती इटलीला देऊं लागली. इ. स. १३४० ते १५४० हा इटलीच्या प्रबोधनाचा काळ होय. फ्लॉरेन्स, व्हेनिस, मिलान या नगरराज्यांत आणि रोममध्येहि या काळांत विद्या, कला, साहित्य यांना, प्राचीन काळच्या ग्रीससारखाच, बहर आला होता. पेट्रार्क व लिओनार्डो दि हिन्सी यांचा उल्लेख वर आलाच आहे. डांटे, वोकॅशिओ, मायकेल एंजलो, लॉरेंझो, मॅकिअव्हिली, डोनाटेलो, अलवर्टी हीं नांवें त्यांच्यासमवेत उभी केली की, इटलीच्या कर्तृत्वाने डोळे दिपूं लागतात. यांतले कोणी महाकवि आहेत, कोणी कादंबरीकार आहेत. मायकेल एंजलोसारखे कोणी शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत. गुइसिआर्डिनीसारखे इतिहासकार आहेत. पॉलिटियन-