पान:इहवादी शासन.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ९९
 


अंधश्रद्धेला शह

 मागे अनेक ठिकाणी सांगितलें आहे की, इहवादाचा धर्माला विरोध नाही. परमेश्वरी श्रद्धेचें त्याला वावडे नाही. पण ती श्रद्धा, बुद्धि, विचारस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा सत्यसंशोधन, प्रयोगसिद्ध ज्ञान यांना शृंखला घालूं लागली की, समाजाचा घात करते. मानवी प्रज्ञेची व कर्तृत्वाची हत्या करते. पोपच्या धर्मपीठाने शेकडो वर्षे ही हत्या चालविली होती. नवलाची गोष्ट अशी की, फ्रॅन्सिस्कन्, डॉमिनिकन् या धर्मपंथांतील लोकांनीच प्रथम पोपच्या त्या घातकी धर्माला शह देऊन मानवी मन मुक्त केलें.
 कोपरनिकसची खगोलविज्ञानाची परंपरा पुढे टायकोब्राही, केप्लर, गॅलिलिओ, न्यूटन, या थोर शास्त्रज्ञांनी चालविली व सर्व खगोलाचें रूपच पालटून टाकलें. टायकोब्राही याने एक नवा तारा शोधून काढला. केप्लरने गतीच्या तीन नियमांचें स्थूल रूप सिद्ध केलें. न्यूटनचे गुरुत्वाकर्षण याच पायावर पुढे उभें राहिलें. गॅलिलिओने दुर्बीण सिद्ध करून सर्व अंतरिक्ष सूक्ष्मपणे न्याहाळण्याची सोय करून दिली. चंद्रावरचे डोंगर, सूर्यावरचे डाग, गुरूचे उपग्रह, शनीची कडीं, शुक्राच्या कला हे अद्भुत चमत्कार त्याने दुर्बिणींतून स्वतः पाहिले व लोकांना दाखविले. लोकांना हा नवा खगोल पाहून मोठा हर्ष झाला. ते सहस्र संख्येने गॅलिलिओच्या शास्त्रीय व्याख्यानांना येऊं लागले. पण यामुळे रोमच्या पीठाचें पित्त भडकलें. त्याने त्याला पकडलें व 'आपले सिद्धान्त खोटे आहेत' असें लिहून देण्यास फर्मावलें. गॅलिलिओ आता वृद्ध झाला होता. धार्मिक न्यायपीठाच्या कारागृहांतील यातना सोसणें त्याला शक्य नव्हतें. त्याने तसे लिहून दिलें.
 जिऑरडॅनो ब्रूनो (१५४८- १६००) या शास्त्रज्ञाला १६०० सालीं पृथ्वीच्या भ्रमणाचा सिद्धान्त सांगितल्याबद्दल जिवंत जाळण्यांत आलें होतें. गॅलिलिओने माघार घेतल्यामुळे तो बचावला, पण तो आपलें कार्य करून गेला होता. त्याने कांही नुसतें तात्त्विक मत सांगितलें नव्हतें. लोकांना, सहस्रावधि लोकांना, त्याने नवा खगोल प्रत्यक्ष दाखविला होता. धर्मभ्रष्ट, पतित, अंध अशा रोमच्या पीठावर त्याचा परिणाम झाला नाही; पण लोकांच्या मनांत त्याने निश्चित परविर्तन घडवून आणलें होते. कांही धर्मगुरूंनाहि त्याने जिंकलें होतें. गॅलिलिओच्या खटल्यांत कार्डिनल वॅलरमाइन याने प्रमुखपणें भाग घेतला होता. गॅलिलिओच्या भाषणाचा त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला की, तो म्हणाला, "सूर्य स्थिर असून पृथ्वी फिरते याचें प्रत्यक्ष प्रमाण दिसल्यानंतर आपण बायबल पुन्हा वाचलें पाहिजे; आणि या नव्या सिद्धान्ताच्या विरुद्ध अशीं जीं वचनें आपल्याला आढळतील त्यांचा अर्थ आपल्याला कळला नव्हता हें ध्यानांत घेऊन त्यावर नवें भाष्य केलें पाहिजे. जें प्रत्यक्ष दिसलें तें खोटें म्हणणें केव्हाहि युक्त नाही." याचेंच नांव इहवाद !