पान:इहवादी शासन.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८ । इहवादी शासन
 

न मानतां अवलोकन व प्रयोग यांनी स्वतंत्र बुद्धीने सत्याचा शोध घ्यावा अशी ज्ञानपद्धति याने उपदेशिली. म्हणून त्यालाच आधुनिक कालखंडाचा प्रवर्तक मानतात. चाक्षुष विज्ञान, परावर्तनाचे नियम, इन्द्रधनुष्य, गुरुदर्शक भिंग हे याचे संशोधनाचे विषय होते. खगोलाचा नव्या पद्धतीने अभ्यास करून त्याने पंचांगाची सुधारणा करण्याचे प्रयत्न केले होते. गणित, हवामान इत्यादि सर्वच विषयांत याची गति अकुंठित होती आणि त्यामुळे त्याचीं मतें धर्मपीठाला पाखंडी वाटून त्याने चोवीस वर्षे त्याला कारागृहांत बद्ध करून ठवलें होतें.
 प्रयोगसिद्ध ज्ञान व रोमच्या पीठाला मान्य असलेले रूढ ज्ञान यांचा संग्राम येथूनच सुरू झाला. कारावासाच्या दीर्घ यातना सोसूनहि बेकन याने सत्याचा व विवेकाचा बळी दिला नाही. म्हणन आधुनिक काळांतील नवविचारांचा व स्वतंत्र, मुक्त मानवी मनाचा प्रभातकाल याच्यापासूनच सुरू झाला, असें मानतात. अल्बर्ट मॅग्नम् (११९३-१२८०) याला रॉजर बेकनच्या खालोखाल याच कारणासाठी मान देतात. हाहि रॉजर बेकनप्रमाणेच अत्यंत धर्मनिष्ठ होता. तरी त्याने सर्व आयुष्य विज्ञान व्यासंगांत घालविलें व पदार्थविज्ञान, निसर्गशास्त्र या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले. निकोलस ऑरिसमी हा वर सांगितलेल्या विल्यम ऑफ ओकहॅमचा शिष्य. इतर ग्रहांबरोबर पृथ्वीहि फिरते हे त्याने सूचित केलें होतें. फ्रॅन्सिस्कन पंथ हा सेंट फ्रॅन्सिस (११८२-१२२६) याने १२०९ साली स्थापन केला. त्याच सुमारास सेंट डॉमिनिक याने डॉमिनिकन पंथांची स्थापना केली. या वेळीं पोपप्रणीत जो रुढ धर्म तो कर्मकाण्डप्रधान झाला असून भोगलोलुपता, धनलोभ, भ्रष्टता हीच धर्मगुरूंची प्रधान लक्षणें झालीं होतीं. या हीन प्रवृत्तींचा निषेध करून या नव्या पंथांनी वैराग्य, रंजल्या गांजलेल्यांची सेवा, इंद्रियनिग्रह, नीतिनिष्ठा, निरहंकार वृत्ति, हीं खरीं धर्माचीं लक्षणें असा उपदेश करण्यास प्रारंभ केला. हा उपदेश करीत व दीन, अनाथांची सेवा करीत या पंथाचे अनुयायी केवळ युरोपांतच नव्हे तर चीन, अरबस्थान, हिंदुस्थान, आफ्रिका अशा दूरच्या देशांतहि भ्रमण करीत. ते अनवाणी चालत, दारिद्र्याची त्यांनी शपथ घतलेली असे. आणि दलितांची सेवा हे त्यांचें व्रत असे. या दोन्ही पंथांचे संस्थापक ज्ञानोपासक नव्हते. विद्वत्ता, पांडित्य यांवर त्यांचा विश्वास नव्हता. श्रद्धा, भक्ति, उपासना, नामस्मरण हाच खरा मार्ग होय, अशी त्यांची निष्ठा होती. तरीहि रूढ धर्ममताला निंद्य मानून, स्वतंत्र बुद्धीने धर्माचीं लक्षणें निश्चित करून, त्यांचे प्रतिपादन करण्यांत यांनी जी निर्भय वृत्ति प्रकट केली, जें विचारस्वातंत्र्य अवलंबिले व आपल्या अनुयायांना उपदेशिलें त्यामुळे त्या पंथांत हळूहळू ज्ञानाची उपासना सुरू झाली आणि त्यांच्यांतूनच अल्बर्ट मॅग्नस व रॉजर बेकन यांसारखे नवयुगाचे प्रवर्तक उदयास आले. बुद्धिस्वातंत्र्याचा, विवेकनिष्ठेचा महिमा हा असा आहे.