पान:इहवादी शासन.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ९७
 


चिकित्सक बुद्धि

 स्वतः अवलोकन करणें, स्वतः प्रयोग करणें आणि उपलब्ध ज्ञानाची, पूर्वीच्या ग्रंथांतील सिद्धान्तांची, रूढ विचारांची, स्वतः बुद्धीने चिकित्सा करून मगच सत्यासत्य निर्णय करणें हें प्रबोधन-युगाचे पहिले लक्षण होय. ग्रीक विद्येने लोकांना ही नवी दृष्टि दिली होती. त्या दृष्टीने ते आता भूगोल, खगोल, निसर्ग व मानवी शरीर यांच्याकडे पाहूं लागले, तेव्हा धर्मग्रंथांत सांगितलेले सिद्धान्त, विचार, मतें चुकीचीं आहेत, प्रामादिक आहेत असें त्यांच्या ध्यानांत आलें आणि प्रयोगाने व अवलोकना प्राप्त झालेले ज्ञान हे पंडित प्रत्यक्ष प्रमाणांनी लोकांच्या पुढे मांडूं लागल्यामुळे त्यांची पोप व जीर्ण धर्मग्रंथ यांच्यावरची अंधश्रद्धा ढळू लागली.
 मार्कोपोलो हा इटालियन प्रवासी (१२५४- १३२४) आशिया खंडांत प्रवास करून आला व १२९९ साली त्याने आपला प्रवासवर्णनाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. पोर्तुगालचा राजा प्रिन्स हेन्री (१४१५- ६१) याला या ग्रंथांची एक प्रत १४२८ साली मिळाली. समुद्रपर्यटनाच्या आकांक्षा आधीच त्याच्या मनांत उसळत होत्या. आता त्यांना जोराने चालना मिळाली. पोर्तुगीज प्रवासी १४५३ च्या सुमारास गायना या पश्चिम आफ्रिकेंतल्या देशाला जाऊन पोचले, कोलंबसाने १४९२ सालीं अमेरिका खंड शोधून काढलें आणि वास्को-दि-गामा हा १४९८ सालीं आफ्रिकेला वळसा घालून हिंदुस्थानला येऊन पोचला. या शोधांमुळे युरोपीयांच्या मनांतलें जगाचें रुढ चित्र पार बदलून गेलें. आशियामध्येहि सुसंस्कृत लोक आहेत, त्यांची संस्कृति आपल्याइतकीच किंवा जास्तच प्रगत आहे आणि त्यांचें जग सर्वस्वीं निराळें आहे, हें युरोपीय लोकांच्या ध्यानांत आल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या, जिज्ञासा प्रबळ झाली आणि त्यांच्या मनाची मरगळ नाहीशी होऊन एक नवाच उत्साह त्यांच्या ठायीं निर्माण झाला.

वेकनचे प्रतिपादन

 भूगोलाप्रमाणेच खगोलाचेंहि नवें दर्शन या वेळी शास्त्रज्ञ घडवूं लागले. या विषयांतला अत्यंत क्रांतिकारक असा जो सूर्यकेंद्रसिद्धान्त तो कोपर्निकस (१४७३- १५४३) या पोलिश खगोलशास्त्रज्ञाने सांगितला. पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्याभोवतीं फिरतो हा टॉलेमीचा सिद्धान्त असत्य ठरवून त्याने सूर्य हा विश्वाचें केंद्र आहे व पृथ्वी त्याच्याभोवती फिरत आहे, असा सिद्धान्त मांडला. आधुनिक खगोलशास्त्राचा कोपर्निकस हा जनक मानला जातो व तें सयुक्तिकच आहे. पण त्याच्याहि आधी त्याने व पुढे केप्लर, न्यूटन यांनी सांगितलेल्या सिद्धान्तांची चाहूल बाराव्या शतकांतील शास्त्रज्ञांना लागली होती. या शास्त्रज्ञांचा आद्य पुरुष म्हणजे रॉजर बेकन् (१२१४- १२९४) हा होय. हा फ्रॅन्सिस्कन पंथाचा एक धर्म गुरु असूनहि प्रस्थापित धर्ममतें
 इ. शा. ७