पान:इहवादी शासन.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इहवादी शासन।नऊ
 

इहवादाचा सिद्धान्त या बांगला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याने सिद्ध होत आहे. हा सिद्धान्त वर सांगितल्याप्रमाणे इतिहासाच्या पानापानांवर लिहिला आहे. पण 'चक्षुर्वैसत्यम्' अशी ही घटना आहे. म्हणून तिच्याकडे लक्ष वेधण्याला जास्त अर्थ आहे.
 हा अर्थ वरील समाजांच्या बाबतींत खरा ठरला तर भारतीय जनता एकात्म होईल व भारतीय जवानांनी या युद्धांत जें रक्त सांडलें तें सार्थकी लागेल.
 पण तें कसेंहि असले तरी श्रीमती इंदिरा गांधी यांनी धीराने, संयमाने, मुत्सद्देगिरीने पावले टाकून शेवटीं वेळ येतांच बांगला देशाला मान्यता देण्याचा जो निर्णय घेतला तो इहवादाच्या दृष्टीने भारताच्या इतिहासाला निश्चित वळण लावील यांत शंका नाही. इतिहासांत त्याला अनन्यसामान्य असें महत्त्व आहे.
 'इहवादी शासन' ही लेखमाला केसरींत चालू होती तेव्हा या ग्रंथाच्या प्रकाशनाचा विचार नेहमीप्रमाणेच मनांत चालू होता. पण तो विचार फार वेळ करावा लागला नाही. श्री. जयंतराव टिळक यांच्यापाशीं प्रश्न काढतांच त्यांनी केसरी प्रकाशनातर्फे हा ग्रंथ प्रकाशित करण्याचें मान्य केलें. त्यामुळे माझी ती विवंचना एकदम दूर झाली. जयंतरावांचा यासाठी मी अतिशय ऋणी आहे. केसरीचे सहसंपादक श्री. वि. स. वाळिंबे यांचाहि मी असाच ऋणी आहे. हा विषय मनांत घोळत असतांना मी त्यांच्याशी चर्चा करीत असे. तशी चर्चा करीत असतानांच एक दिवस त्यांनी सांगितलें, ही लेखमाला मी रविवारच्या केसरींत प्रसिद्ध करतों. केसरींत ही माला आल्यामुळे तिला खूपच प्रसिद्धीहि मिळाली आणि लेखनाचें उद्दिष्ट बरेंच साध्य झालें.
 केसरींतील प्रकाशन विभागाचे प्रमुख श्री. चितळे व त्याच विभागांतील श्री. भास्करराव कुलकर्णी यांनी छपाईच्या कामाकडे जातीने लक्ष पुरविल्यामुळे ग्रंथाचें बाह्यरूप मनोहर झालें आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. श्री. कुलकर्णी यांना मुद्रितें तपासण्याची माझ्यापेक्षाहि जास्त काळजी असे. प्रत्येक पान ते स्वतः वाचीत व पूर्ण समाधान झाल्याखेरीज मंजूर करीत नसत. ही दक्षता फार दुर्मिळ आहे.
 पुण्यांतल्या ग्रंथालयांविषयीचा माझा अनुभव पूर्वापार फार चांगला आहे. या ग्रंथलेखनाच्या काळांतहि मला त्याचाच पुनःप्रत्यय आला. आमच्या स. प. कॉलेजचें ग्रंथालय तर घरचेंच ग्रंथालय. तेथले कोणतेंहि पुस्तक तर मी उचलून आणीत असेच, पण तेथे नसलेली पुस्तकेंहि अन्य ग्रंथालयांतून आणून माझ्या घरीं पोचविण्याची तेथील ग्रंथपालांनी नेहमी कसोशी केली. तीच गोष्ट केसरी-मराठा ग्रंथालयाची. लेखकाला ग्रंथ पुरविण्याचा यावच्छक्य प्रयत्न करणें हें आपलें कर्तव्य आहे नव्हे व्रत आहे- असेंच हे ग्रंथपाल मानतात असें दिसतें. माझे श्रम त्यामुळे किती तरी हलके झाले. पुणे विद्यापीठ, गोखले इन्स्टिटयूट, भारतीय संस्कृति कोश