पान:इहवादी शासन.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६ । इहवादी शासन
 

होता. कायदा व राजसंस्था या गोष्टी त्याच्या मते परमेश्वरप्रणीत नसून परिस्थिति, गरज यांप्रमाणे त्या निर्माण होतात, म्हणून त्या पूर्ण मानवकृत आहेत. शिक्षणाच्या बाबतींत तो प्लेटोचा अनुयायी असून, स्त्रियांनाहि पुरुषांप्रमाणेच शिक्षण मिळालें पाहिजे, असा त्याचा आग्रह असे.


 प्रबोधन- युगापासून युरोपचा अर्वाचीन इतिहास सुरू होतो. त्याच्या आधीचें युग म्हणजे मध्ययुग. त्यालाच तमोयुग म्हणतात. अंधधमसत्तेने मानवी बुद्धि, प्रज्ञा आणि त्यामुळेच एकंदर कर्तृत्व हतप्रभ करून टाकलें होतें, ज्ञान-सूर्याला या युगांत ग्रहण लागलें होतें, म्हणून त्याला तमोयुग म्हणतात. तेराव्या शतकांत राष्ट्रभावनेमुळे पोपच्या धर्मसत्तेविरुद्ध सर्वत्र उठाव कसा झाला, रोमन दंडविधानाच्या अभ्यासामुळे एक नवीन बुद्धिजीवी वर्ग निर्माण होऊन त्यानेहि त्याला पाठिंबा कसा दिला आणि वायक्लिफ्, जॉन हस यांच्या धर्मस्वातंत्र्याच्या चळवळीमुळे पोपच्या सत्तेचा पायाच कसा नि खिळून पडला हे आपण मागल्या लेखांत पाहिलें. या संग्रामांतूनच चवदाव्या शतकांत जें प्रबोधनयुग निर्माण झाले त्याचें स्वरूप आता पाहावयाचें आहे.
 प्रबोधन म्हणजे नवजागृति, पुनरुज्जीवन. (रेनसान्स). या व पुढल्या शतकांत ग्रीक विद्येचें पुनरुज्जीवन झालें, त्या विद्येचा सर्व युरोपभर पंडितांनी आग्रहाने प्रसार केला आणि त्यांतून नवीन ज्ञानाचें संशोधन व संपादन होऊं लागलें म्हणून या युगाला प्रबोधन-युग म्हणतात. तेराव्या शतकांतहि ग्रीक विद्येचा अभ्यास सुरू झाला होता. मार्सिग्लिओ, विल्यम्, दुवॉइस् हे ॲरिस्टॉटलचेच शिष्य होते, हें मागे सांगितलेच आहे. पण तरी तेराव्या शतकांत ग्रीक विद्या सर्वत्र पसरली होती, असें म्हणतां येणार नाही. चौदाव्या शतकांत इटालियन कवि पेट्रॉर्क (१३०४- १३७४) याने त्या विद्येच्या प्रसारार्थ पद्धतशीर प्रयत्न केले आणि त्याच्या अनुयायांनी शाळा- महाशाळांतून वर्ग चालवून, व्याख्यानें देऊन, ग्रंथशाळा स्थापून त्या विद्येचे संस्कार सर्व पश्चिम युरोपीय देशांत लोकमानसावर करण्याचे अखंड प्रयत्न चालविले. मॅन्युएल क्रिसो लोरास, थिओडोर गाझा, लॉरेंझो, मेडिसी (इटली), जोहान मुल्लर, रुडाल्फ ॲग्रिकोला (जर्मनी), ग्रेगरी टिफरसन्, जेरोम ॲलिअंडर (पॅरिस) हीं नावें यासाठी प्रसिद्ध आहेत. पंधराव्या शतकांत तुर्कांनी (१४५३) काँस्टान्टिनोपल जिंकून घेऊन, पूर्व रोमन साम्राज्य नष्ट केल्यामुळे तेथले सर्व ग्रीक पंडित आपल्या ग्रंथांसह पश्चिम युरोपांत आले. त्यामुळे त्यांच्या विद्येचा प्रसार अतिशय वेगाने झाला. ती विद्या पूर्णपणें इहवादी असल्यामुळे तिची तत्त्वें पश्चिम युरोपांतील सामान्य जनतेंतहि रुजूं लागलीं व मानवी कर्तृत्वाला पडलेल्या बेड्या हळूहळू ढिल्या होऊं लागल्या.