पान:इहवादी शासन.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ९५
 

तत्त्ववेत्त्यांचें विचारधन पाहून हा लेख संपवू. इहवाद, बुद्धिप्रामाण्य, राजसत्तेचें श्रेष्ठत्व यांचें समर्थपणें प्रतिपादन करणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये पदुआ नगरीचा पंडित मासिंग्लिओ (१२७०- १३४०) हा अग्रगण्य होय. मार्सिग्लिओ हा पोपच्या अधिसत्तेचा अगदीं हाडवैरी होता. सर्व ख्रिस्ती जगांतील लोकांच्या सार्वमताने पोपची निवड व्हावी व लोकांच्या सार्वमताचें त्याच्यावर पूर्ण नियंत्रण असावें, तो कर्तव्यच्युत झाल्यास त्याला पदच्युत करण्याचाहि अधिकार लोकांना असावा, असें मत त्याने मांडलें आहे. त्याचप्रमाणे ऐहिक क्षेत्रांत त्याला कसलाहि अधिकार असूं नये आणि पारमार्थिक क्षेत्रांतहि पीठाचा एकंदर कारभार राजसत्तेच्या अंकित असावा, रोमन सम्राटांच्या निवडणुकीवर व त्यांच्या कारभारावर त्याचें कसलेंहि नियंत्रण असूं नये, असे विचार अतिशय आग्रहाने आपल्या ग्रंथांत त्याने मांडले आहेत.
 मार्सिग्लिओ हा ऑरिस्टॉलचा भक्त होता. त्याची विद्वत्ता इतकी असामान्य होती की, त्याला प्रति ॲरिस्टॉटल म्हणत. वायक्लिफने आपले तत्त्वज्ञान त्याच्या ग्रंथावरूनच घेतलें होतें.
 पदुआच्या मार्सिग्लिओप्रमाणेच इंग्लंडमधील ओखॅमचा विल्यम् हा दुसरा तत्त्ववेता (१२९०–१३४५) त्याच्या प्रमाणेच निःस्पृह, निर्भय लेखनामुळे पश्चिम युरोपांत गाजला होता. मार्सिग्लिओप्रमाणेच त्याचीं मतें असून, एक पाऊल पुढे जाऊन त्याने पोपलाच पाखंडी व नास्तिक ठरविलें होतें. हे दोघेहि पंडित फ्रॅन्सिस्कन पंथाचे अनुयायी असून, पोप व इतर धर्माचार्य यांच्या राजवैभवाची व विलासाची त्यांना चीड होती. द्रव्यलोभी, मोहमूढ लोकांना धर्मक्षेत्रांत कोणतेंहि स्थान असू नये, असा विचार ते आग्रहाने मांडीत तो यामुळेच. मार्सिग्लिओपेक्षा विल्यमच्या ग्रंथांचा प्रभाव युरोपी मनावर त्या वेळी जास्त पडला होता.
 तिसरा, याच विचारांचा तत्त्ववेत्ता म्हणजे इटलीचा महाकवि डांटे हा होय (१२६५–१३२१). ऑगस्टाइनच्या मतावर त्याने कडक टीका करून राजाच्या ऐहिक सत्तेवर धर्मसत्तेचें नियंत्रण असावें, या त्याच्या मताचा निषेध केला आहे. डांटे हा राष्ट्रवादी नव्हता. रोमन साम्राज्याचा तो अभिमानी होता. आणि सर्वं युरोपवर एकच साम्राज्यसत्ता असावी, असें त्याचें मत होतें. मात्र तें साम्राज्य रोमन-इटालियन लोकांचें असावें असा त्याचा आग्रह होता. प्राचीन काळी त्यांनी दीर्घकाळ साम्राज्यसत्ता चालविली असल्यामुळे युरोपच्या साम्राज्यपदाला तेच लायक होत असें त्याला वाटे.
 पियरी डुवाईस हा फ्रेंच पंडित (ग्रंथ - रिकव्हरी' इ. स. १३००). डांटेसारखाच साम्राज्यसत्तावादी होता. पण त्याच्या मतें, फ्रेंच राजे हेच खरे सम्राटपदाला लायक होते. अशा रीतीने साम्राज्यसत्तावादाचा पुरस्कार करता करतां या दोघांहि थोर पंडितांनी नकळत आपल्या सुप्त मनांतील राष्ट्रनिष्ठा प्रकट केली आहे. पण ते दोघे इहवादी होते, हें आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांतहि डूवॉइस् हा जास्त इहवादी