पान:इहवादी शासन.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ९३
 

भाविक ख्रिस्ती लोक मानतात. वायक्लिफने बायबलच्याच आधारें हें सर्व झूट आहे, असें दाखवून दिले.

नवे मन्वन्तर

 रोमच्या धर्मपीठाच्या दृष्टीने हें सर्व भयंकर पाखंड होते. हा अत्यंत निंद्य असा नास्तिकवाद होता. त्याला जिवंत जाळण्याखेरीज दुसरी शिक्षाच नव्हती. पण त्या वेळीं वायक्लिफला इंग्लंडमधील राजघराण्यांतील समर्थ पुरुषांचा पाठिंबा होता. जॉन ऑफ् गाँटसारखे कांही सरदार स्वतःच धर्मसुधारक होते. त्यामुळे वायक्लिफ् हा पोपच्या यमदंडापासून सुटू शकला. पण त्याचा वारसा पुढे चालविणारे जे लोलर्ड पंथाचे लोक त्यांना मात्र प्राणदंड भोगावा लागला. राजा हेन्री हा प्रतिगामी होता. त्याने १४०१ सालीं लोलर्डाच्याविरुद्ध कायदा केला आणि त्या मताच्या सर्व लोकांना जिवंत जाळून मारण्याची शिक्षा फर्मावली. पण आपल्या मतांचा तत्वांचा त्याग न करतां, लोलर्ड पंथीयांनी ती शिक्षा शांतपणें भोगली. जॉन सॉट्रे हा अशी शिक्षा भोगणारा इंग्लंडमधला पहिला धर्मवीर होय. त्यानंतर अनेक लोलर्डांनी अशीच शिक्षा भोगली व नवें मन्वंतर सुरू झाल्याचें जगाला अग्नीच्या साक्षीने सांगितले. तत्त्वासाठी आत्मबलिदान करण्याचें धैर्य ही जगांतील सर्वश्रेष्ठ शक्ति होय.
 लोलर्डांचे बळी घेतले ते अंध धर्माने घेतले हें खरें, पण ते पोपच्या धर्मपीठाने घेतलेले नव्हते, इंग्लंडमधले राजे, सरदार व लोक यांचा, राष्ट्रभावनेमुळे, पोपच्या अधिसत्तेला विरोध होता. पण त्यामुळे ते सर्व अंध, असहिष्णु, शब्दप्रामाण्यवादी धर्माच्या मनगरमिठींतून मुक्त झाले होते असें नाही. आणखी एक-दोन शतकें इंग्लंडमध्ये अंध धर्मसत्ता असेच बळी घेत राहिली होती, असें इतिहासावरून दिसून येईल. मात्र हा अत्याचार पोपने केला असतां तर त्याच्याविरुद्ध भयंकर भडका उडाला असता. कारण तेथे इंग्लंडची राष्ट्रीय अस्मिता दुखावली असती. बोहेमियामध्ये जॉन हसच्या प्रकरणी पोपच्या सुलतानीमुळे त्या राष्ट्राची अस्मिता दुखावली आणि पोपला फ्रान्सच्या फिलिप राजाने जशी अद्दल घडविली तशीच, बोहेमियन सेनापति झिस्का याने पुन्हा एकदा घडविली.
 जॉन् हस् (१३६९–१४१५) हा बोहेमियांतील प्रागच्या विद्यापीठांत प्राध्यापक अनून, वायक्लिफचा अनुयायी होता. वर सांगितलेलें वायक्लिफचें सर्व तत्त्वज्ञान त्याला तंतोतंत पटलें होतें. आणि त्याचें प्रतिपादनहि तो तशाच निर्भयपणें करीत असे. वास्तविक जॉन हस् हा अत्यंत धर्मनिष्ठ व चारित्र्यसंपन्न होता. ख्राइस्ट व बायबल यांवर त्याची अढळ श्रद्धा होती. पण रोमच्या पीठाला त्याचें मुळीच महत्त्व नव्हतें. चारित्र्याचा, नीतीचा व त्या पीठाचा कसलाच संबंध नव्हता. ख्राइस्ट व बायबल हें त्याचें फक्त भांडवल होतें. त्यावरील लोकांची अंध, भोळी श्रद्धा ही त्याची शक्ति होती. वायक्लिफ व हस यांनी तिच्यावरच आघात केला