पान:इहवादी शासन.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२ । इहवादी शासन
 

होता व त्याचें पठण व अध्ययन लोकांनी स्वतः करण्यास पोपची सक्त मनाई होती. अशा लोकांना तो देहदंडाची शिक्षा सांगे. आपल्याकडे शूद्रांना वेदपठणास बंदी होती, तसाच हा प्रकार होता. वायक्लिफने पोपचा हा दंडक उपमर्दण्याचें ठरवून बायबलचें इंग्रजीत भाषांतर केलें व त्याच्या हस्तलिखित प्रती देशभर पसरून दिल्या; आणि बायबल स्वत: वाचण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असें प्रतिपादन केलें.
 वायक्लिफचे हे दोन सिद्धान्त म्हणजे पोपच्या सत्तेला सुरुंगच होते. कारण देव-मानवांतील मध्यस्थी व बायबलचा एकाधिकार यांवरच पोपचें सर्व वैभव, त्याचे राजविलास व त्याची सत्ता अवलंबून होती. पण वायक्लिफला हे धर्मपीठाचें राजवैभवच मुळी मान्य नव्हतें. धर्मगुरूंनी वैराग्याने, निष्कांचन स्थितींतच राहिलें पाहिजे, संपत्तीचा स्पर्श होतांच ते धर्मगुरु या पदाला नालायक होतात असे तो म्हणे

दोन स्वतंत्र सत्ता

 पोपच्या म्हणजे रोमच्या धर्मपीठाच्या राजकीय सत्तेविषयी त्याचें हेंच मत होतें. धर्मपीठ व राजपद या दोन स्वतंत्र संस्था असून धर्माची राजशासनावर कधीहि सत्ता असता कामा नये, राजशासन हें स्वतंत्रच असले पाहिजे, धर्मपीठाने त्यावर सत्ता चालविणें हें पाप आहे, असें त्याचें मत होतें. या त्याच्या मतामागे राष्ट्रभावनेची प्रेरणा होती हे उघड आहे. इंग्लंड हें स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र असून राजकीय तर राहोच पण धार्मिक क्षेत्रांतहि त्यावर बाह्य अशा कोणा व्यक्तीची सत्ता चालावी, याची त्याला चीड होती. तो स्वतः राजसत्तावादी होता आणि इंग्लंडमधील धर्माचार्यांवरहि कर, न्यायदान, त्यांची मिळकत या सगळ्या बाबतीत इंग्लंडच्या राजाचीच सत्ता असली पाहिजे, असें स्वच्छ प्रतिपादन तो करी. धर्म पीठाला जशी परमेश्वराकडून सत्ता मिळते तशी राजालाहि परमेश्वराकडूनच सत्ता मिळते, ती पोपकडून मिळते हा दावा खोटा आहे, असा विचार तो सतत मांडीत असे. मात्र या दोन्ही सत्ता लोकसेवेसाठी परमेश्वराने दिलेल्या आहेत, राजा किंवा पोप स्वार्थी, विलासी होताच त्यांना कसलाहि अधिकार राहत नाही, असें त्याने अनेक ठिकाणी बजावून सांगितलें आहे.
 वायक्लिफच्या या मतावरून तो व्यक्तिवादी, बुद्धिवादी व प्रखर राष्ट्रवादी होता हें स्पष्ट दिसून येते. इहवादाचा हाच पाया आहे. प्रत्येक मनुष्याला पूर्ण विवेक-स्वातंत्र्य असले पाहिजे, त्याच्या विचार-उच्चार आचारांवर कोणतेंहि अंध, तर्कशून्य, सुलतानी बंधन असतां कामा नये, हेंच व्यक्तिवादाचें मुख्य तत्त्व होय. वायक्लिफ् या दृष्टीने पूर्ण व्यक्तिवादी होता. प्रचलित अंधरूढीवर, लोकभ्रमांवर तो अशीच कडक टीका करीत असे. 'प्रभुभोजन' नामक धार्मिक विधीच्या वेळीं जें मद्य व भाकरी वापरण्यांत येते त्यांचें ख्रिस्ताच्या रक्तांत व मांसांत रूपांतर होतें, असें