पान:इहवादी शासन.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ९१
 

१३७६ पर्यंतचे सर्व पोप निलाजरेपणाने तेथे रहिले. त्यामुळे धर्मसत्तेच्या विटंबनेला सीमाच उरली नाही. कारण इटालियन लोकांना पोपचें हें कृत्य न आवडल्यामुळे त्यांनी रोमच्या पीठावर दुसरा पोप बसविला; आणि मग या दोन पोपांमध्ये, "मी खरा कीं तुं खरा ?" असा आपल्याकडच्या शंकराचार्यांसारखा वाद चालू झाला.
 पुढे पिसा नगरीच्या धर्ममंडळाने या वादाला कंटाळून दोघांनाहि पदच्युत करून अलेक्झांडर नांवाच्या गृहस्थाची त्या पदी नियुक्ति केली. पण त्या धर्ममंडळाला प्रत्यक्षांत सत्ता नसल्यामुळे आता दोहोचे तीन पोप झाले आणि त्या सर्वसत्ताधारी धर्मपीठाची राहिलीसाहिली प्रतिष्ठाहि नष्ट झाली. हा सर्व नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रनिष्ठेचा प्रभाव. नव्या विद्यापीठांच्या मागे ही निष्ठा उभी होती.
 राष्ट्रभावना आणि विद्यापीठे यांबरोबरच या काळांत रोमन धर्मपीठाच्या निरंकुश सत्तेला आव्हान देणारी आणखी एक शक्ति आता निर्माण होत होती. रोमचें धर्मपीठ आज अनेक शतकें निरंकुश सत्ता भोगीत होतें. त्यामुळे त्याचा नीतिदृष्ट्या कमालीचा अधःपात झाला होता. हजारो एकर जमीन पीठाच्या व धर्मगुरूंच्या ताब्यांत असे. कराच्या रूपाने ते अगणित पैसा गोळा करीत. लोकांना त्यांनी केलेल्या पापापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी मुक्तिपत्रे काढली. तीं विकत घेतली की, आपल्या कपाळीचा नरक टळेल व आपल्याला मोक्ष मिळेल, अशी लोकांची श्रद्धा असल्यामुळे असंख्य पत्रे खपत. प्रत्येक देशांत धर्मगुरूंनी त्यांची दुकानेंच काढलीं होतीं. त्यावरहि धर्मपीठांना राशीने पैसा मिळाला. निरंकुश सत्ता व पैसा हाती आल्यावर धर्मपीठें व धर्मगुरु किती चारित्र्यहीन, भ्रष्ट व धर्महीन झाले असतील याची सहज कल्पना येईल. (हिस्टोरियन्स हिस्टरी ऑफ दि वर्ल्ड, खंड ७ वा, पृष्ठे ६४८-४९).
 इतके दिवस भोळ्या धर्मश्रद्धेमुळे हे भोगविलासहि आपल्याकडच्या 'महाराजां'च्या भोगविलासांप्रमाणे लोकांना कौतुकास्पद वाटत. त्यांतून कोणाला ते निंद्य वाटले, तरी त्याबद्दल टीका करण्याचें वा त्याचा जाब विचारण्याचे धाडस कोणालाहि नव्हतें. पण आता ॲरिस्टॉटल, प्लेटो यांच्या अध्ययनामुळे आणि राष्ट्रभावनेमुळे लोकांच्या ठायीं व्यक्तिवाद उदयास येत होता व या धार्मिक अत्याचारांविरुद्ध घोष करण्याचें व त्यासाठी प्राणदंडहि सोसण्याचे सामर्थ्य, धैर्यं त्यांच्या ठायीं निर्माण होत होतें. तिसरी शक्ति ती हीच.
 ऑक्सफर्ड विद्यापीठांतील प्रा. जॉन वायक्लिफ् हा अशा लोकांत अग्रगण्य होता (१३२४–१३९४). सोळाव्या शतकांत लूथरने जी धर्मसुधारणेची चळवळ केली तिचा खरा जनक वायक्लिफ् हा होता. मनुष्य व परमेश्वर यांमध्ये मध्यस्थ म्हणून पोप, कार्डिनल, बिशप, प्रीस्ट अशा धर्माचार्यांची मुळीच गरज नाही, मनुष्याने भक्ति, प्रार्थना, नामस्मरण करून परमेश्वराशी प्रत्यक्ष संबंध जोडला तरच त्याला मोक्ष मिळेल, असा त्याचा सिद्धान्त होता. आणि आपल्या लेखांतून, व्याख्यानांतून त्यांचें तो निर्भयपणें प्रतिपादन करीत असे. बायबल हा धर्मग्रंथ त्या वेळी लॅटिन भाषेत