पान:इहवादी शासन.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९० । इहवादी शासन
 

तेथील पंडित व विद्यार्थी करूं लागले. या विद्यापीठांत अजूनहि धर्मशास्त्रावरच जास्तभर होता हें खरें. वैद्यकाच्या अभ्यासांत अजूनहि प्रयोग, अवलोकन यांना स्थान नव्हतें हेंहि खरें. पण मूळ ग्रीकांचें ज्ञान प्रायोगिकच असल्यामुळे ते संस्कार पश्चिम युरोपांतील विद्यार्थ्यांच्या मनावर होऊं लागले. याला फार महत्त्व आहे. प्रबोधनयुगांत विज्ञानाचा जो विकास झाला त्याचीं बीजें येथेच पेरली गेली असें फिशर- सारख्या इतिहासवेत्त्याचें मत आहे.
 रोमन दण्डविधान (कायदा) याचे महत्त्व असेंच आहे. त्याच्या अभ्यासामुळे पश्चिम युरोपांत एक बुद्धिजीवी नवा वर्गच निर्माण झाला आणि व्यापार, शालेय शिक्षण राजनीति यांवर धर्मसत्तेचें वर्चस्व असूं नये; इहवादी दृष्टीने, म्हणजे समाजाच्या प्रगति- परागतीच्या दृष्टीने त्यासंबंधीचें धोरण आखावें, असें तो सांगू लागला. पियरी डुवॉइस् या कायदेपंडिताचें उदाहरण देऊन जॉर्ज सवाइनने हा विचार चांगला स्पष्ट केला आहे. फिलिप दि फेअर या फ्रान्सच्या राजाने (१२८५- १३१४) पोपच्या सत्तेला आव्हान दिलें त्या वेळीं हा सर्व मध्यमवर्ग त्याच्या पाठीशी होता, असें तो म्हणतो. (हिस्टरी ऑफ पोलिटिकल थिअरी, जॉर्ज सवाइन, पृष्ठें २३३–३४) या वेळी रोमच्या पीठावर वॉनिफेस आठवा हा पोप होता. त्याला नवोदित राष्ट्रभावनेची कल्पना आली नव्हती. आपल्या पूर्वीचे इनोसंट, ग्रेगरी हे जे पोप त्यांच्याप्रमणेच, आपणहि निरंकुश सत्ता गाजवावी, असें त्याने ठरविलें. फिलिप दि फेअर याने फ्रान्समधील धर्मगुरु व धर्ममठ यांवर कर बसविले तेव्हा राजाला तो अधिकार नाही, असा फतवा काढून फ्रेंच धर्मगुरूंना तो कर देण्यास त्याने मनाई केली. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, त्या धर्मगुरूंनीच पोपला कडवा विरोध केला व आपण राजाची सत्ता मानणार व कर भरणार असें जाहीर केलें. पोपने नेहमीच्या नीतीला अनुसरून फ्रेंच सरंजामदारांना राजाविरुद्ध उठण्यास चिथावणी दिली. पण तेंहि त्याची आज्ञा मानीनात.
 याचा अर्थ एकच की, ते धर्मगुरु व सरंजामदार आता फ्रेंच झाले होते. रोमनिष्ठेपेक्षा त्यांच्या लेखीं राष्ट्रनिष्ठेलाच जास्त महत्त्व होते. आता तें नवीन संघटनतत्त्व उदयास आलें होतें. (जॉर्ज सवाइन, पृष्ठे २३४-३५). पोप वॉनिफेस याला त्याचें सामर्थ्य आकळले नाही. म्हणून तो आज्ञापत्र मागे घेईना. तेव्हा फ्रेंच राजा फिलिप याने रोमला कांही कारस्थानी लोक धाडून पोपला कैद करून फ्रान्सला आणलें ! देशोदेशीच्या राजांना व रोमन सम्राटांनाहि धुळींत लोळविणारा पोप आज एका राजाने सहज कैदी म्हणून धरून आणला ! फिशरने मुद्दाम म्हटले आहे की, या वेळी फ्रान्समध्ये विरोधाची कुजबुजसुद्धा ऐकूं आली नाही. (हिस्टरी ऑफ् युरोप पृष्ठ २७९ ). अंध धर्माची सर्वंकष सत्ता नष्ट झाल्याचेंच हें लक्षण होय. आणि तेवढ्यावरच हें भागलें नाही. फ्रान्सच्या राजाने आव्हिग्नॉन हें रोमसारखेंच एक धर्मपीठ निर्माण केलें व तेथेच पोपला राहवयास भाग पाडलें. आणि १३०९ पासून