पान:इहवादी शासन.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । ८९
 


सामर्थ्याचा अभाव

 पोपची सत्ता जर्मन (रोमन) सम्राटांनाहि दुःसह होती हें खरें आहे. पण रोमन सम्राटांच्या मागे बळ असें कोठलेच नव्हतें. जनतेची श्रद्धा पोपवर होती. तिच्या मनांत आपले राजे म्हणून, आपले सम्राट् म्हणून त्यांच्यावर भक्ति असावयाची, तर जर्मनीखेरीज बाकीच्या प्रांतांतील लोकांना ते सम्राट् परके वाटत होते. कारण त्यांची प्रत्यक्ष सत्ता त्या प्रांतावर कधीच नव्हती. पवित्र रोमन साम्राज्य हे फक्त नांवालाच साम्राज्य होतें. व्हाल्टेअरने म्हटल्याप्रमाणे तें पवित्र नव्हतें, रोमन नव्हतें आणि साम्राज्यहि नव्हतें. अशा स्थितींत त्याच्या सम्राटांना पोपची सत्ता कितीहि दुःसह असली, तरी तिच्याशी मुकाबला करतां येईल, असें कसलेंच सामर्थ्य त्यांच्या ठायीं नव्हतें.
 ऑटो दि ग्रेट, फ्रेडरिक बार्बरोसा व फेडरिक दुसरा हे सम्राट् कर्तबगार होते, पराक्रमी होते. कांही काळ त्यांनी पोपशीं झगडा यशस्वीपणें केलाहि. पण अंतीं त्याच्यापुढे त्यांना गुडघे टेकावे लागले. त्यांच्या या पराभवाचें आणखी एक कारण आहे. रोमन सम्राट् हे सर्व जर्मन राजे होते. इतर देशांच्या राजांप्रमाणे जर्मनीचे राजे होण्यांत त्यांनी भूषण मानलें असतें, जर्मनी प्रथम संघटित करण्याचें त्यांनी धोरण ठेवलें असतें, तर ते समर्थ झाले असते. पण त्यांना पवित्र रोमन सम्राट् या पदाचा अनिवार मोह होता. तें पद मिळवावयाचें, तर इटलीवर सत्ता प्रस्थापित करणें व पोपकडून अभिषेक करून घेणें हें अवश्य होते. त्यामुळे ते आपली सर्व शक्ति त्यांतच खर्च करीत आणि इटालियन लोकांचा या परक्या सत्तेला कडवा विरोध असल्यामुळे, त्यांना कांही काळ विजय मिळाला, तरी शेवटीं पराभव पत्करावा लागे व मग पोपपुढे गुडघे टेकावे लागत.
 इंग्लिश, फ्रेंच या देशांच्या राजांनी स्वराष्ट्राच्या अस्मितेशी एकरूप होण्यांत भूषण मानले. त्यामुळे इतके दिवस त्यांच्या देशांच्या जनतेची, पोपला पाठिंबा देणारी शक्ति, आता त्यांच्या मागे उभी राहिली; आणि तिच्या आधारें पोपचें आततायी, जुलमी वर्चस्व झुगारून देण्यांत ते यशस्वी झाले. राष्ट्रवाद हा इहवाद आहे हें आपण ध्यानांत घेतलें तर नव्या मन्वंतरामागची ती एक प्रबळ प्रेरणा होती हें आपल्याला पटेल.

विद्यापीठांचे कार्य

 या तेराव्या शतकांतच पोपच्या सर्वंकष धर्मसत्तेला विरोध करणारी दुसरी एक शक्ति पश्चिम युरोपांत निर्माण होत होती. ती म्हणजे नव्याने स्थापन झालेली विद्यापीठें व तेथे होणारा ग्रीक व रोमन विद्यांचा अभ्यास ही होय. बोलोना, सातेर्नो, पॅरिस, ऑक्सफर्ड येथे हिपॉक्रीटस व गेलन या ग्रीक वैद्यांच्या शास्त्राचा अभ्यास सुरू झाला आणि विशेष म्हणजे रोमन कायद्याचें अध्ययन व अध्यापन