पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
इस्लाम आणि संस्कृति



करावयाचा, लूटमार करावयाची, खून पाडावयाचे वगैरे प्रकार तेथे सर्रास चालत हे आपण मागे पाहिले आहे. हजरत पैगंबरांनी सर्वत्र विखुरलेल्या लोकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये सामुदायिक जीवन प्रस्थापित केले. भातृभाव किंवा बंधुता ही समाज टिकवणारी फार मोठी शक्ति आहे; ती शक्ति त्यांनी निर्माण केली. आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरें आहोत, एकाच कुटुंबांत राहणारे आहोत, आपणामध्ये बंधुभाव असणे नैसर्गिक व आवश्यक आहे या इस्लामच्या प्रचारामळे विखुरलेली जनता एकत्र आली, तिच्यामध्ये जिव्हाळा निर्माण झाला, बंधुता प्रत्यक्षात दिसू लागली.
 समाजामध्ये उच्चनीच, काळागोरा, स्पृश्य-अस्पृश्य हे भेदाभेद असणे केव्हाही श्रेयस्कर नाही. अशा कृत्रिम भेदभावांमुळे समाजात असंतोष फैलावतो; समाजामधील निरनिराळ्या शक्तींचा संचय होण्याऐवजी त्यामध्ये झगडा सुरू होतो; द्वेषाचे बीज पेरले जाते. हे संकट टाळण्याकरितां इस्लामनें समतेचा जोरांत पुरस्कार केला आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान आहे. केवळ तो गरीब म्हणून त्याची कां अवहेलना करण्यांत यावी ! केवळ तो अशिक्षित म्हणून त्याला कां धिक्कारण्यांत यावें ! केवळ तो दलित म्हणून त्याला का ठोकरण्यांत यावें ! तोही मनुष्य आहे; त्यालाही भावना आहेत. समाजांतील विषमतेचे चटके त्याला जाणवतात. त्याला दिलेली तुच्छतेची वागणक त्याच्या जिव्हारी लागते. त्याच्या बाबतीत दाखविलेला भेदाभेद त्याचे अंतःकरण भेदून जातो. समाजपुरुषाच हात बळकट कर असे कोणी त्याला सांगितले तर तो विकट हास्य करून म्हणेल की असा समाज राहण्यापेक्षां तो नष्ट झालेला बरा. इस्लामने हा धोका ओळखून समतेस धर्माज्ञेचे स्वरूप दिले आहे.