पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

७१


 लोकांनी आपल्या उपदेशाचा अव्हेर केला म्हणून संतापून न जातां आपण शांतपणे वागले पाहिजे, लोक आपल्याशी सहमत होत नाहीत म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती करणे किंवा तलवारीचा धाक दाखविणे पवित्र कुराणच्या आदेशाविरुद्ध आहे. उपदेश करण्यापलीकडे कोणतीही मर्यादा ओलांडावयाची नाही हा आदेश लक्षात घेतां ' जबरदस्तीच्या जोरावर धर्माचा प्रसार करा' अशी इस्लामची आज्ञा नाही हे स्पष्ट झाले आहे.
 मुस्लिमांना व खुद्द हजरत पैगंबरांना कित्येक वेळां तलवार - हातांत घ्यावी लागली ही गोष्ट सत्य आहे, पण ती कां घ्यावी लागली याचे उत्तर पवित्र कुराणमध्ये सांपडते.
 “ ज्यांच्याशी युद्ध पुकारले गेले आहे व ज्यांच्यावर जुलूम होत आहे अशांनाच लढण्याची परवानगी दिली आहे."

-पवित्र कुराण २२:३९.


 आपल्या विरुद्ध कोणी प्रथम युद्ध पुकारील तर त्याच्याशी लढण्याची आज्ञा इस्लाम धर्माने दिली आहे. त्याचप्रमाणे आपल्यावर जलूम करून आपला निःपात करण्याचा चंग बांधण्याऱ्या विरुद्ध शस्त्र घेण्यास संमति देण्यात आली आहे; याचाच अर्थ स्वत:च्या स्वसंरक्षणाकरितां ( Defence ) किंवा प्रतिकाराकरितां आपण.. लढले पाहिजे. ज्यांच्याकडून निरपराधी मुले, स्त्रिया आणि पुरुष यांचा छळ मांडण्यांत आला आहे त्यांच्या विरुद्धही लढण्याची आज्ञा दिली आहे. कांहीं कारण नसतां आपण होऊन दुसऱ्याशी युद्ध करण्याकरितां हाती शस्त्र घेण्यास इस्लाम धर्माची मनाई आहे.