म्हणजे 'धर्माच्या बाबतींत जबरदस्ती करूं नका' अशी स्पष्ट आज्ञा पवित्र कुराणमध्ये देण्यात आली आहे. जबरदस्तीने कोणताही धर्म किंवा तत्त्व फैलावत नसते किंवा त्यास स्थैर्य मिळत नसते. जबरदस्तीने फार तर तात्पुरता कार्यभाग झाल्यासारखे वाटेल, पण त्यामुळे मनुष्याच्या सदसद्विवेक बुद्धीवर काडीमात्र उपयोग होत नाही. तिला जोपर्यंत कोणतीही गोष्ट पटत नाही तोपर्यंत आपण वाटेल तेवढी जुलूमजबरदस्ती केली तरी तिचा काही उपयोग होत नाहीं. जबरदस्ती करण्यापेक्षां किंवा तलवारीचा धाक दाखविण्यापेक्षां मनुष्याच्या बुद्धीला आवाहन करणे हीच महत्त्वाची गोष्ट आहे असें इस्लाम धर्म समजतो.
-पवित्र कुराण १६:१२५.
आपल्या धर्माचे महत्त्व पटवितांना आपण शहाणपणाने व संयमाने वागले पाहिजे. आपला प्रतिपाद्य विषय मांडतांना रागाच्या आहारी न जातां अत्यंत शांतपणाने वादविवाद केला पाहिज. वादविवादांत आपल्या मनाचा तोल जाऊं नये अशी मुस्लिमाने खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ, दुसऱ्याचे मन दुखावेल अशा तऱ्हेची भाषा वापरण्यास इस्लामनें मनाई केला आहे.
-पवित्र कुराण १६:८२.