पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

६३



 आणि त्यांच्यामध्ये भेदाभेद करीत नाही त्यांना परमेश्वर पारितोषिक देईल.”

-पवित्र कुराण ४:१५२.


 परमेश्वर आणि त्याने भूतलावर पाठविलेल्या पैगंबरांच्या अवतारकार्यावर प्रत्येक मुस्लिमानें भरंवसा ठेवला पाहिजे. पैगंबरांचे कार्य थोर व संशयातीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये श्रेष्ठतर, श्रेष्ठतम असा भेदाभेद न करितां सर्वांबद्दल सारखा आदर व विश्वास प्रकट केला पाहिजे. कांहीं पैगंबरांबद्दल विश्वास व कांहीं पैगंबरांबद्दल अविश्वास बाळगणे किंवा धर्माच्या अतिरेकी कल्पनेमळे फक्त आपल्या धर्माच्या पैगंबरांचे अस्तित्व मान्य करणे या गोष्टी इस्लाम धर्मानें धर्मबाह्य मानल्या आहेत. पवित्र कुराणच्या 'अन्-निसा' या अध्यायांत ( १५० वी ऋचा ) परमेश्वर व त्यांचे पैगंबर यांबद्दल अविश्वास बाळगणारा किंवा त्यांच्यामध्ये भेदभाव करणारा 'नास्तिक' आहे असा स्पष्ट उल्लेख केला आहे. नास्तिक कधीही मुस्लिम होऊ शकत नाही, असा इस्लामचा दावा आहे.
 " अल्लाखेरीज लोकांनी इतर देव मानले तर त्या देवांना शिवीगाळ करू नका."

-पवित्र कुराण ६:१०९.


 आपल्या धर्माच्या अभिनिवेशांत परधर्मीयांच्या देवादिकांविषयीं अभद्र बोलणे किंवा शिवीगाळ करणे हे अयोग्य आहे. आज आपण देवादिकांविषयीं अश्लिल भाषा वापरूं तर उद्या आपल्या सर्वशक्तिमान परमेश्वराचीही तशीच संभावना होईल; याकरितां अशा असहिष्णुतेपासून दूर राहण्याचा इस्लामचा आदेश आहे.