पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

५७


 देऊन इस्लामनें मानवी संस्कृति समृद्ध करण्यासं केवढी तरी मदत केली आहे.
 प्रत्येक व्यक्तीनें वाणीचे व कृतीचे पावित्र्य पाळले पाहिजे. अर्वाच्य बोलणे, शिवीगाळ करणे, अभद्र शब्द उच्चारणे यांपासून आपण परावृत्त झाले पाहिजे. उन्मत्तपणाने बढाया मारणे हा देखील वाणीचा दुरुपयोग आहे. संपत्तीच्या किंवा अधिकाराच्या धुंदीत वाटेल त्या बढाया मारणे हा आपला हक्क आहे असे कित्येकांना वाटते. अशा उन्मत्तपणाचा निषेध करण्यांत आला आहे.
 "गर्विष्ठ व बढाईखोर माणसावर परमेश्वर प्रेम करीत नाही."

-पवित्र कुराण ४:३६.


 नम्रतापूर्वक बोलणे हा वाणीचा सदुपयोग समजला जातो. कठोरपणानें कोणालाही टाकून बोलणे हे सभ्यतेस सोडून आहे. लोक आपल्याशी फटकून वागतील अशा तज्हेची कटु भाषा आपण कधीही वापरता कामा नये.
 " लोक आपल्याशी फटकून वागतील अशा त-हेची भाषा वापरणारा मनुष्य परमेश्वराच्या दृष्टीने अधम मानला जातो."

--हजरत मुहम्मद पैगंबर.


 परमेश्वराने आपल्याला वाणी दिली हेच त्याचे आपल्यावर किती तरी उपकार आहेत. या वाणीचा दुरुपयोग करणे म्हणजे परमेश्वराशी कृतघ्न बनणे होय. अशा कृतघ्न माणसास अधम समजण्यांत आले तर ते योग्यच ठरेल. आपल्या वाणीचा सदुपयोग करणें हें आपलें कर्तव्य आहे असें सभ्य गृहस्थ समजतो. आपल्या तोंडून चुकून देखील अपशब्द पडणार नाही अशी खबरदारी तो सदैव घेत असतो.