पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
इस्लाम आणि संस्कृति


त्याला धमशील असे कधींच म्हणतां येत नाही. अशा गृहस्थाच्या प्रार्थनेची परमेश्वर पर्वाही पण करीत नाही. पैशाच्या किंवा सत्तेच्या धुंदीत अनाथांना दुरुत्तरे द्यावयाची, गोरगरिबांना पिळन काढावयाचे, लोकांना छळावयाचे आणि इकडे पांच वेळां प्रार्थना करून आपण धर्मशील आहोत असा देखावा करावयाचा ही गोष्ट परमेश्वरास कधीच आवडत नाही.
 दया हे धर्माचे जीवन आहे; तिला जातगोत माहित नसते; स्वकीय व परकीय असा भेदाभेद ती करीत नाहीं; स्वधर्मी व परधर्मी असा पंक्तिप्रपंच तिला वावडा असतो; इतकेच नव्हे तर सज्जन व दुर्जन असा भेदही ती ओळखीत नाही.
 "जगांतील प्रत्येक व्यक्तीवर, मग ती वाईट असो वा चांगली ,असो, दया करा, वाईट माणसांवर दया करणे म्हणजे वाईटपणापासून त्या माणसास परावृत्त करणे होय.”

-हजरत मुहम्मद पैगंबर.


 'वाईटाचा बदला चांगल्या गोष्टीने द्या' या तत्त्वाची बीजें वरील हजरत पैगंबरांच्या आज्ञेत आपणांस दिसून येतील, वाईट माणसांशी जशास तसे या न्यायाने वागणे म्हणजे स्वतः त्या माणसाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसणे होय. अशा वागण्याने आपण आपलें स्वतःचे नुकसान करून घेतोच पण त्या वागण्याचा वाईट माणसावर कांहींच परिणाम होत नाही. उलट तो माणूस चिडून अधःपाताच्या गर्तेत अधिक खोल जाऊं लागतो.

"वाईट गोष्ट चांगल्या गोष्टीने परतवा."


-पवित्र कुराण १३:२२.