पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
इस्लाम आणि संस्कृति


 इस्लाम धर्मास आईविषयी केवढा आदर वाटतो हे हजरत पैगंबरांच्या वरील वाक्यावरून सिद्ध होण्यासारखे आहे. मातापित्यांच्या भक्तीस या धर्मांत इतके महत्त्व आहे की दररोज पांच वेळां प्रार्थना करीत असतां, प्रार्थनेमध्ये त्यांचा उल्लेख करण्यांत येऊन, त्यांना सद्गति देण्याकरितां परमेश्वरास आळविण्यांत येते.
 प्रत्येक मुस्लिम कुटुंबवत्सल असला पाहिजे. आपली पत्नी, मुले आणि नातेवाईक यांच्याशी त्याने अत्यंत प्रेमळपणाने वागले पाहिजे. इस्लाम धर्मांत पत्नीला घरची ‘राज्ञी' समजण्यांत येते. तिला कोणत्याही प्रकारे दुखवू नका असा धर्माचा आंदेश आहे.

“तुमच्या पत्नीला संतुष्ट राखा."


–पवित्र कुराण ६६:१


 ती दुःखीकष्टी होईल अशा त-हेचे वर्तन कोणीही करूं नये. तिला शिव्याशाप किंवा मारहाण करणाऱ्या पतीचा धिक्कार करण्यांत आला आहे. त्याचप्रमाणे आपली मुलेबाळे व नातेवाईक यांच्याशी सहृदयतेने वागले पाहिजे. आपले नातेवाईक हे दूरचे लोक नसून ते आपल्या कुटुंबियांपैकीच आहेत असे समजले पाहिजे.
 तसेंच प्रेमाचे वर्तन आपल्या शेजाऱ्याशीही ठेविले पाहिजे. शेजारधर्म हा एक श्रेष्ठ धर्म समजून शेजाऱ्यांच्या सुखदुःखांशी आपण समरस झाले पाहिजे. त्यांना त्रास होईल किंवा त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे कृत्य आपल्या हातून चुकून देखील होणार नाही याबद्दल आपण तत्पर असले पाहिजे.
 "जो स्वतः पोटभर जेवतो व शेजाऱ्यांना उपाशी ठेवतो तो सच्चा मुसलमान नव्हे."

-हजरत मुहम्मद पैगंबर.