पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

४९



 “आईबापांच्या वृद्धापकाळी त्यांच्या मनाला लागेल असा एकही धिःकारयुक्त शब्द वापरूं नका किंवा धमकीवजा बोलूं नका. त्यांच्याशी नेहमीं गोड बोला.”

--पवित्र कुराण १७:२३

 वृद्धापकाळी तर आईबापांना अतिशय जपले पाहिजे. मनुष्य वृद्ध झाला की त्याची विचारशक्ति कमकुवत होते किंवा त्यांच्यामध्ये सर्वसाधारणपणे चिडखोरवृत्ति येते; त्याच्या तोंडून एकादा उणा शब्द बाहेर पडणे साहजिक असते. या गोष्टीचे नीट स्मरण ठेवून आपल्या वृद्ध आईबापांशी वागतांना आपण फार खबरदारी घेतली पाहिजे. वृद्धापकाळांत त्यांना टाकून बोलण्यास किंवा दुरुत्तरें देण्यास इस्लामनें सक्त मनाई केली आहे. त्यांच्या हातून एकादी चूक झाली तरी त्या चुकीची त्यांना जाणीव करून न देतां त्यांच्याशी नेहमी प्रेमळपणाने वागले पाहिजे.
 " स्वर्गात प्रवेश मिळवू इच्छिणारांनी प्रथम आपल्या आईबापांस संतुष्ट केले पाहिजे."

-हजरत मुहम्मद पैगंबर

 स्वर्गप्राप्ती ही आईबापांच्या संतुष्टतेवर अवलंबून आहे असें इस्लाम मानतो. आपण वाटेल तेवढी पुण्यकृत्ये केली आणि आईबापांचा छळ चालं ठेवला तर आपणांस स्वर्ग कधीच मिळणार नाही. आईबापांचा शाप लवकर भोंवतो हे लक्षात ठेवून त्यांना प्रसन्न ठेवण्याची आपण पराकाष्टा केली पाहिजे.

" मातेच्या पायांखाली स्वर्ग आहे."


-हजरत मुहम्मद पैगंवर


इ.सं.४