पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
इस्लाम आणि संस्कृति
नीतितत्वे


 "इस्लामच्या नीतिशास्त्राचा त्या धर्माशी निकट संबंध आहे आणि त्या नीतिशास्त्राची तत्त्वे परमेश्वरी आज्ञा समजल्या जातात."

—सर थॉमस अर्नोल्ड, डी. लिट., पीएच्. डी.


 इस्लाम धर्मांत नीतितत्त्वांना फार उच्च स्थान आहे. नीतितत्त्वांना महत्त्व न देतां, नुसत्या धर्मतत्त्वांचा अवलंब केला तर इस्लाम धर्माचे पालन परिपूर्ण होऊ शकत नाही. नीतिशास्त्र हे इस्लाम धर्माचे अधिष्ठान मानले जाते. ते अधिष्ठानच गेले तर धर्माचे अस्तित्व तरी कसें राहील ! परमेश्वरी स्वरूपाशी तादात्म्य होणे हे इस्लाम धर्माचे मुख्य कार्य असल्यामुळे, ती तादात्म्यता संपादण्याचा मार्ग म्हणजे नीतितत्त्वे आत्मसात करणे होय. अशा काही महत्त्वाच्या नीतितत्त्वांचा आपणांस संक्षेपाने विचार करावयाचा आहे.
 "आईबापांशी दयाळूपणाने वागा अशी परमेश्वराची तुम्हांला आज्ञा आहे."

-पवित्र कुराण १७:२३


 आपल्या आईबापांशी प्रेमळपणाने वागणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. त्यांनी आपणांस जन्म दिला, आपल्याकरितां अनेक खस्ता खाऊन आपणांस लहानाचे मोठे केले, हे. त्यांचे महदुपकार आपण कधीही विसरता कामा नये. या जगामध्ये आपल्यावर जर कोणाचे सर्वांत मोठे ऋण असेल तर ते आईबापांचे आहे. या ऋणांतून अंशतः का होईना मुक्त होण्याकरितां आपण त्यांच्याशी दयाशील वृत्तीने वागले पाहिजे.